MC Stan wins Bigg Boss 16 : एमसी स्टॅन सगळ्यांवर भारी...! पठ्ठ्याने प्रियंका, शिवला हरवत क्षणात गेमच बदलला...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:07 AM2023-02-13T01:07:54+5:302023-02-13T01:12:17+5:30
Bigg Boss 16: बिग बॉसचा आजचा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित धक्का होता. कारण अखेरच्या क्षणापर्यंत शिव आणि प्रियंकाच जिंकणार, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यातही प्रियंका हीच शोची विजेती होणार, असा विश्वास सोशल मीडियावर अनेक युजर्स व्यक्त करत होते.
Bigg Boss 16 Winner: धमाकेदार ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेत अनपेक्षित थरार पाहायला मिळाला. एमसी स्टॅन (MC Stan) हा यंदाच्या सीझनचा विजेता ठरला. बिग बॉसचा आजचा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित धक्का होता. कारण अखेरच्या क्षणापर्यंत शिव आणि प्रियंकाच जिंकणार, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यातही प्रियंका हीच शोची विजेती होणार, असा विश्वास सोशल मीडियावर अनेक युजर्स व्यक्त करत होते. अगदी आज सकाळपासूनच प्रियंकाचे ट्रॉफी घेतलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पण अंतिम क्षणी सगळेच दावे, अंदाज फोल ठरलेत. शिव ठाकरेच्या चाहत्यांचीही निराशा झाली. एमसी स्टॅनची लोकप्रियता सगळ्यांवर भारी ठरली.
Congratulations Winner of #BiggBoss16 none another #McStan 👏🏻 👏🏻👏🏻#AsimRiaz
— ᴀꜱɪᴍ ʀɪᴀᴢ ᴜɴɪᴠᴇʀꜱᴇ 💛 (@AsimRiazworld) February 12, 2023
pic.twitter.com/81Vw9cvKae
प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालीन भनोट, एमसी स्टॅन, अर्चना गौतम अशा पाच फायनलिस्टमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणाला शालीन भनोट आणि अर्चना हे दोघं बाद झालेत आणि प्रियंका, शिव व एमसी स्टॅन असे टॉप ३ फिनाले रेसमध्ये उरलेत.
या तिघांमधून ‘बिग बॉस १६’चा विजेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना प्रियंकाही बाद झाली आणि शिव व स्टॅन असे टॉप २ स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले. यापैकी कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सलमानने स्टॅनच्या नावाची घोषणा केली. एमसी स्टॅनला बिग बॉसची ट्रॉफी सोपवण्यात आली. ‘बिग बॉस 15’ची ट्रॉफी उंचावताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
शिव आणि प्रियंकाने पहिल्या एपिसोडपासूनच फ्रंट फूटवर राहून दमदार खेळ खेळला आहे. या दोघांच्या गेम प्लॅन आणि स्ट्रॅटेजीलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रियंकाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ खेळला. ती सगळ्यांना अगदी पुरून उरली. शिवच्या साधेपणानं चाहत्यांची मनं जिंकलीत. शिवचा सच्चेपणा लोकांना भावला. पण एमसी स्टॅनने सगळ्यांवर मात करत विजेतेपद स्वत:कडे खेचून आणलं. एमसी स्टॅन हा त्याच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. त्याचा '80 हजार के जूते' हा सोशल मीडियावर डायलॉग खूप व्हायरल झाला होता. एमसी स्टॅनचे शूज, टी-शर्ट आणि बेल्ट या वस्तू अनेकांचे लक्ष वेधतात. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली.