"मी रोज रात्री बाथरुममध्ये जाऊन रडायचो", बिग बॉस विजेता मुनव्वरचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:07 PM2024-01-30T12:07:19+5:302024-01-30T12:07:41+5:30
विजेता झाल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वरने 'बिग बॉस'च्या घरातील प्रवासाबाबत भाष्य केलं आहे.
'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारुकी 'बिग बॉसच्या १७'व्या पर्वाचा विजेता ठरला. सर्वाधिक मतं मिळवत मुनव्वरने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 'बिग बॉस १७'च्या घरात मुनव्वरच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीतही अनेक खुलासे झाले. आता विजेता झाल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वरने 'बिग बॉस'च्या घरातील प्रवासाबाबत भाष्य केलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेत कॉमेडियनची पोलखोल केली होती. मुनव्वरचे अनेक मुलींबरोबर अफेअर असल्याचा खुलासा आयेशाने केला होता. आता विजेता ठरल्यानंतर मुनव्वरने इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य करत बिग बॉसच्या घरातील कठीण काळही सांगितला. "ट्रॉफी उचलल्यानंतरचं फिलिंग मला शब्दात सांगता येणार नाही. ही ट्रॉफी मला मिळाली. पण, यासाठी मला खूप काही द्यावं लागलं आहे. आणि त्याचं मोलही तेवढं आहे. शेवटी मी केवळ ट्रॉफीच घरी घेऊन जात नाहीये तर याबरोबर खूप गोष्टी घेऊन जातोय," असं मुनव्वर म्हणाला.
पुढे तो म्हणाला, "माझं वैयक्तिक आयुष्य शोमध्ये अशाप्रकारे समोर आलं. पण, त्या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. त्या परिस्थितीला मला सामोरं जायचं नव्हतं. पण, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी जे काही केलं त्याचा मला अभिमान आहे, अशातली गोष्ट नाही. पण, मला आता पुढे गेलं पाहिजे. यामुळे मला मानसिक त्रास झाला. असा एकही दिवस गेला नाही ज्यादिवशी मी रडलो नाही. मी रात्री बाथरुममध्ये जाऊन किंवा ब्लँकेट घेऊन रडायचो."
कॉमेडियन मुनव्वर फारुकीने पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात त्याचं स्थान पक्क करण्यास सुरुवात केली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी तो एक होता. 'बिग बॉस'चं विजेतेपद मिळवल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफीबरोबरच ५० लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे.