Bigg Boss 18: "तुम्ही परत या", 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना मिस करतोय अभिनेता, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:24 PM2024-10-17T15:24:58+5:302024-10-17T15:26:47+5:30
आठवड्याभरानंतरच सदावर्तेंना बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉस फेम अभिनेत्याने ट्वीट केलं आहे.
Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले होते. सदावर्तेंनी त्यांच्या स्टाइलने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्यास सुरुवात केली होती. पण, आठवड्याभरानंतरच सदावर्तेंना बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉस फेम अभिनेत्याने ट्वीट केलं आहे.
गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक होते. हटके स्टाइलने त्यांनी बिग बॉसच्या घरावर ताबा मिळवला होता. अतरंगी स्वभाव असलेल्या सदावर्तेंनी प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली होती. आणि म्हणूनच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही प्रेक्षक त्यांना मिस करत आहेत. बिग बॉस फेम अभिनेता मनू पंजाबीने याबाबत ट्वीट केलं आहे. "गुणरत्नजी आम्ही तुम्हाला मिस करतो...तुम्ही लवकर परत या कारण, तुम्ही डाकूंच्या खानदानातील आहात", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मनु पंजाबी 'बिग बॉस १०' आणि 'बिग बॉस १४' या पर्वात सहभागी झाला होता. आताही बिग बॉसचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Gunratan ji Aapko miss karte rhe hai aajao vapas quki aap Dakuo ke khandan se hai..🤣😂 #comebacksoon#GunratanSadavarte#BiggBoss18#JioCinema
— Manu Punjabi (@manupunjabim3) October 15, 2024
सदावर्तेंना एका आठवड्यानंतर बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पडण्यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. "कानून के हाथ बडे लंबे होते है... मला शो सोडावा लागला कारण मला कोर्टाची नोटीस मिळाली होती. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलेलं नाही. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेमुळे मला शो सोडावा लागला. २०१४ पासून माझी पत्नी जयश्री पाटील याचा लढा देत आहे. ही खूप महत्त्वाची केस होती आणि माझं तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं", असं ते म्हणाले.