ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:35 AM2024-10-09T11:35:27+5:302024-10-09T11:36:36+5:30
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे.
Bigg Boss 18: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या दिवसापासूनच सदावर्ते बिग बॉसच्या घरात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. घरातील सदस्यांबरोबर त्यांच्या हटके स्टाइलने मैत्री करण्याबरोबरच ते प्रेक्षकांचंही पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात नुकताच महाराष्ट्रातील सत्तापालटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे. त्याबरोबरच ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालवल्याचा गौप्यस्फोटही सदावर्तेंनी केला आहे. "उद्धव ठाकरेंचं सरकार माझ्यामुळे पडलं. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. सहा महिने हा संप सुरू होता. त्यामुळे उध्दव ठाकरे -शरद पवार यांच्यावर प्रेशर आलं. त्यामुळे त्यांचं सरकार पडलं. सहा महिने आम्ही हा संप चालवला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेतील काही आमदारही माझ्यामुळेच फुटले होते," असंही सदावर्ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप केला होता. जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू होता. गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हा संप करण्यात आला होता. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंची चर्चा रंगली आहे. त्यांचा हटके अंदाज प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत असल्याचं दिसत आहे.