"माझं आडनाव 'खान' म्हणून...", अभिनेत्रीला 'या' गोष्टीसाठी मुंबईत करावा लागतोय संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 08:07 PM2024-06-02T20:07:06+5:302024-06-02T20:07:56+5:30
मी मुंबईत एकटी राहते. माझ्यासोबत कोणीही कुटुंबातील सदस्य नाही...
मुंबईत घर घेण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येतात. त्यातच अनेक कलाकारांना मुस्लिम असल्याने घरासाठी अक्षरश: संघर्ष करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी 'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्रीला शिरीनला असा अनुभव आला होता. आता हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस 17' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री खानजादीलाही (Khanzaadi) मुंबईत घरासाठी संघर्ष करावा लागतोय.
सध्या सोशल मीडियावर खानजादीच्या खुलाश्याची चर्चा आहे. पापाराझींशी बोलताना ती म्हणाली, "मुंबईत घरासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. लोकांना जस कळतं की माझं आडनाव 'खान' आहे ते मला घर देण्यास नकार देतात. कारण मी मुस्लिम आहे. लोक मला ओळखतात कारण मी आज नाव कमावलं आहे. अनेक वर्षांपासून मी मुंबईत आहे आणि अॅडजस्टच करत आहे. पण आता मला माझ्यासाठी एक चांगलं घर पाहिजे. मी मुंबईत एकटी राहते. माझ्यासोबत कोणीही कुटुंबातील सदस्य नाही. पण जेव्हा घर मालकाला समजतं की मी खान आहे ते नकार देतात."
"हे फारच चुकीचं आहे. कोणीही केवळ धर्मामुळे हे सहन केलं नाही पाहिजे. एकताच राहिली नाहीए. येणाऱ्या पिढीला नक्की काय सहन करावं लागणार काय माहित. ही फारच दु:खद गोष्ट आहे. मी आता लहान राहिलेले नाही आणि मला अशी जागा पाहिजे जिथे मी मला सुरक्षित वाटेल पण आता घर घेणं फारच कठीण आहे."
खानजादी स्वत: एक गायिका आणि रॅपरही आहे. तिने MTV HUSTLE 2.0 मध्येही सहभाग घेतला होता. यानंतर ती बिग बॉसमध्ये आली. मात्र पहिल्या आठवड्यातच ती घरातून बाहेर पडली होती. तसंच बिग बॉसच्या फिनालेलाही ती अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगल्या होत्या.