लग्न होताच वैतागली, एका दिवसातच अभिनेत्रीने डिलीट केला वेडिंग अल्बम; नेमकं झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 11:54 AM2024-07-09T11:54:42+5:302024-07-09T11:55:06+5:30
लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा वेडिंग अल्बम सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, अवघ्या एकाच दिवसात तिने लग्नाचे हे फोटो डिलीट केले.
कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकून पार्टनरबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. काही दिवसांपूर्वीच टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉस फेम रेनी ध्यानी विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर रेनीने तिचा वेडिंग अल्बम सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, अवघ्या एकाच दिवसात तिने लग्नाचे हे फोटो डिलीट केले.
रेनी ध्यानीने ५ जुलैला अरेंज मॅरेज केल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. रेनीने पतीबरोबरचे लग्नातील काही खास क्षणांचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते. पण, फोटो अपलोड केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तिने ते डिलीटही केले. यामागचं कारणही अभिनेत्रीने सांगितलं आहे. लग्नाचे फोटो अपलोड केल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी अनेक फोन आणि मेसेज येत होते. त्यामुळे वैतागून सोशल मीडियावरील लग्नाचे फोटोच डिलीट केल्याचं रेनीने सांगितलं.
लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर रेनीने इन्स्टावर स्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिने "यासाठी क्षमा असावी. आम्हाला दिलेल्या शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार. पण, योग्य वेळी योग्य पद्धतीने याची माहिती देऊ. खूप मेसेज आणि फोन आल्यामुळे मला anxiety झाली", असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ जरी डिलीट केले असले तरी रेनीने पतीबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. "अरेंज मॅरेजचं लव्ह मॅरेज झालं. जेव्हा दोघांमधील अंतर कमी होऊन त्याची जागा चेहऱ्यावरील हास्य घेतं", असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.
रेनीने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. रोडिजमधून ती प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर 'बिग बॉस ८'मध्येदेखील ती सहभागी झाली होती. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'चंद्रकांता', 'ये तेरी गलियां' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना ती दिसली.