"बाळासाठी नवऱ्यावर अवलंबून राहायची काय गरज?", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:35 IST2025-02-06T12:35:09+5:302025-02-06T12:35:26+5:30
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

"बाळासाठी नवऱ्यावर अवलंबून राहायची काय गरज?", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत
'बिग बॉस' फेम आणि टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता चर्चेत आली आहे. उतरन या मालिकेतून टीना घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. टीनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ३३ वर्षीय टीनाने अद्याप लग्न केलेलं नाही. ती अविवाहित आहे. टीनाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मातृत्वाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.
टीनाने नुकतीच IANSला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सिंगल मदर होण्याचा विचार करू शकते, असं म्हटलं. "मी एक चांगली आई होऊ शकते, असा मला विश्वास आहे. सिंगल मदर होण्याचा मी अद्याप तरी विचार केलेला नाही. पण, भविष्यात सरोगसी किंवा दत्तक मूल घेण्यासाठी मी निश्चितच विचार करू शकते. दोन मुली दत्तक घेतलेल्या सुश्मिता सेनसारख्या महिलांचं मला कौतुक आहे. मी बंगाली असून माझे आईवडील छोट्या शहरातून आलेले आहेत. तरीदेखील त्यांचे विचार खूप प्रगत आहेत. ते मला नेहमीच पाठिंबा देतात", असं टीना म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "मी एक स्वतंत्र महिला आहे. जर मी माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते. तर मी नक्कीच माझ्या बाळाची काळजीही घेऊ शकते. त्यासाठी नवऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. समाज बदलत आहे आणि या गोष्टींना स्वीकारत आहे. आम्ही सेलिब्रिटी असल्याने नेहमीच आमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा होते. सिनेइंडस्ट्री बदल घडवून आणते असं लोकांना वाटतं. पण, खरं तर समाज हे स्वीकारतो. माझे असे अनेक मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी मूल दत्तक घेतलं आहे. पण, ते सेलिब्रिटी नसल्यामुळे या गोष्टी समोर येत नाहीत".