अंकिता लोखंडेला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, "ऑडिशनसाठी गेले तेव्हा बंद खोलीत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:47 AM2024-02-07T08:47:54+5:302024-02-07T08:49:43+5:30
"मी १८-१९ वर्षांची असताना...", अंकिता लोखंडेने शेअर केला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
'पवित्रा रिश्ता' मालिकेत अर्चना ही भूमिका साकारून मराठमोळी अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेने अंकिताला प्रसिद्धीझोतात आणलं. त्यानंतर अंकिता अनेक सिनेमांमध्येही झळकली. पण, मनोरंजन विश्वात काम करताना तिला सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अंकिताला कास्टिंग काऊचलाही सामोरं जावं लागलं होतं. एका मुलाखतीत तिने हा अनुभव शेअर केला होता.
अंकिताने अभिनय क्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीला अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. एका दाक्षिणात्य सिनेमाच्या ऑडिशनला गेली असता तिला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तेव्हा अंकिताला कॉम्प्रोमाइज करण्यास सांगण्यात आलं होतं, असा खुलासा तिने केला होता. "मी खूप स्मार्ट होते आणि त्या खोलीत एकटीच होते. मी तेव्हा केवळ १९-२० वर्षांची असेन. मी त्यांना विचारलं होतं की तुमच्या प्रॉड्युसरबरोबर मला पार्टी आणि डिनरला जावं लागेल का? जसं त्याने हो म्हटलं मी त्याला सुनावलं होतं," असं अंकिताने सांगितलं होतं.
पुढे ती "मी त्यांना म्हणाले की तुमच्या प्रोड्युसरला फक्त एक मुलगी हवी आहे. काम करण्यासाठी टॅलेंटेड मुलगी नको आहे. असं बोलून मी तिथून निघून गेले. मग त्यांनी माझी माफी मागितली आणि सिनेमात काम देण्यासाठी प्रयत्न करेन असं म्हणाले. पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जरी आता तुम्हाला मला घ्यायचं असेल तरीदेखील मला तुमच्याबरोबर काम करण्यात रस नाही. जेव्हा मी पुन्हा सिनेमे करायला लागले. तेव्हा परत मला हा अनुभव आला होता. मी त्यांचं नाव घेणार नाही. ते मोठे अभिनेते आहेत. त्यांनी माझा हात पकडला तेव्हा मला विचित्र फिलिंग आलं होतं. मी लगेच माझा हात काढून घेतला. मला कळलं होतं की इथेही तशीच परिस्थिती आहे. म्हणून मी तिथून निघून आले,"असंही म्हणाली होती.
दरम्यान, 'बिग बॉस १७'मुळेही अंकिता चर्चेत आली होती. या पर्वात ती पती विकी जैनसह सहभागी झाली होती. अंकिताने कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता ती 'वीर सावरकर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.