माहेरची साडी या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी किशोरी शहाणे यांना झाली होती अशी दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 07:58 PM2019-07-03T19:58:04+5:302019-07-03T20:01:15+5:30
बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे.
'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे.
बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. बिग बॉस मराठी २ मधील स्पर्धक एकमेकांसोबतच नव्हे तर कॅमेऱ्यासमोर देखील प्रांजळपणे त्यांच्या कथा शेअर करत आहेत. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये किशोरी शहाणे यांनी माहेरची साडी या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेचा एक किस्सा सांगितला.
कलाकारांना मालिका किवा चित्रपटांसाठी शूटिंग करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये स्पर्धक किशोरी शहाणे सेटवर झालेल्या दुखापतीबाबत त्यांचा अनुभव सांगताना दिसत आहेत. 'धर पकड' या कॅप्टनसी टास्कनंतर वीणाच्या पायाला सूज आली आहे. त्यामुळे किशोरी आणि हिना तिची काळजी घेत आहेत. याचवेळी हिनाने तिला झालेल्या दुखापतीविषयी सांगितले. ती सांगते, ''मला आजवर अनेकवेळा दुखापत झाली आहे. एकदा तर मी बाइकवरून घसरून पडली होती. त्यावेळी माझ्या पायाची पूर्ण स्किन निघाली होती. पण त्या अवस्थेत देखील पट्टी लावून मी चार दिवस गोव्याला पार्टी करत होते. त्या जखमेची आजही खूण माझ्या पायावर आहे.''
हे ऐकून किशोरी यांना त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'माहेरची साडी' दरम्यान झालेली दुर्घटना आठवली. त्यांनी सांगितले की, ''या चित्रपटामध्ये एक गाणं होतं ज्याच्यात डान्स करताना शेवटी मी आणि माझ्या मैत्रिणी पाण्यात जाऊन खेळतात. पण मी पाण्याच्या आत गेली त्यावेळी माझ्या लक्षातच आले नाही की, माझ्या पायाला मोठी काच लागली. तो क्लायमॅक्स होता गाण्याचा, त्यानंतर पॅकअप होतं, मी त्याच अवस्थेत चित्रीकरण पूर्ण केले आणि 'कट इट, पॅक अप!' असा आवाज आला तेव्हा मी जोरात किंचाळले आणि माझ्या दुखापतीबाबत सगळ्यांना सांगितले.''