Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेच्या रिएंट्रीबाबत वैशाली माडेने दिले हे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:28 PM2019-07-27T12:28:05+5:302019-07-27T12:28:52+5:30
शिवानीला बिग बॉसच्या घरात परत आणणे हे चुकीचे असल्याचे गायिका वैशाली माडेचे देखील म्हणणे आहे.
बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी शिवानी सुर्वेची रिएंट्री झाली आहे. शिवानी आरोग्यविषयक काही तक्रारीमुळे कार्यक्रमातून बाहेर गेली होती आणि आता ती पुन्हा एकदा या कार्यक्रमात परतली आहे. खरे तर शिवानी सुरुवातीला बिग बॉसच्या घरात केवळ पाहुणी असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर आता ती स्पर्धक असल्याचे घोषित करण्यात आले आहे. शिवानीला कार्यक्रमात परत आणून बिग बॉसच्या टीमने इतर स्पर्धकांवर अन्याय केला आहे असे सोशल मीडियाद्वारे लोक आपले मत मांडत आहेत. शिवानीला बिग बॉसच्या घरात परत आणणे हे चुकीचे असल्याचे गायिका वैशाली माडेचे देखील म्हणणे आहे.
वैशाली माडे नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली. या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने झुम टिव्हीशी गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान शिवानीच्या रिएंट्रीबाबत देखील तिने सांगितले. ती म्हणाली की, शिवानी फायनलपर्यंत गेली तर हा इतर स्पर्धकांवर अन्याय होईल. कारण फायनलपर्यंत पोहोचणारे स्पर्धक 100 दिवस बिग बॉसच्या घरात राहाणार आहेत. शिवानी तिच्या मर्जीने बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली होती. ती बाहेर गेल्यानंतर तिने बिग बॉस मराठी 2 चे भाग हे पाहिलेच असणार... प्रत्येकजण कशाप्रकारचा खेळ खेळतंय हे पण तिला कळले असणार... तिला पुन्हा यायची परवानगी दिल्यानंतर आता तिच्याप्रमाणे सगळ्यांनाच ब्रेक घेण्याची परवानगी मिळाली पाहिजे. घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरात घेतले जात असेल तर प्रत्येकजण घरात आजारी पडेल आणि एक आठवड्याचा तरी ब्रेक घेऊन परतेल... शिवानीला स्पेशल ट्रीटमेंट देणे हा इतर स्पर्धकांवर अन्यायच आहे.
शिव ठाकरे, किशोरी शहाणे, माधव देवचक्के, हीना पांचाळ, विणा जगताप, वैशाली माडे, नेहा शितोळे गेल्या आठवड्यात नॉमिनेटेड झाले होते. त्यानंतर किशोरी शहाणे आणि वैशाली माडे डेंजर झोनमध्ये आले आणि वैशाली माडेला या आठवड्यामध्ये घरातून बाहेर जावे लागले असे महेश मांजरेकरांनी सांगितले. वैशालीच्या बाहेर जाण्याने अभिजीत, शिव आणि वीणाला खुप दु:ख झाले. वैशाली, अभिजीत आणि शिव यांचे नाते पहिल्यापासूनच खूप खास होते, ते एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. त्यामुळे त्यांना वाईट वाटणे अगदीच सहाजिकच होते. वैशालीने अभिजीतला सांगितले मला तुझ्या हातात ट्रॉफी बघायची आहे आणि शिवला सांगितले दादाला म्हणजेच अभिजीतला सोडायचे नाही.