घटस्फोटानंतर माझा ‘कबीर सिंग’ झाला होता...; स्रेहा वाघसोबतच्या नात्यावर बोलला अविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 06:26 PM2021-09-26T18:26:59+5:302021-09-26T18:27:39+5:30
Bigg Boss Marathi 3: वयाच्या उणापु-या 19 व्या वर्षी स्रेहाने अविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले.
आठवडाभरापूर्वी सुरू झालेला ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात आपआपलं स्थान मजबूत करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. टास्क, भांडण, वादविवाद हे सगळं सुरू आहेच शिवाय पर्सनल लाईफचे खुलासे होत आहेत. अशात अविष्कार दारव्हेकर (Aavishkar Darwhekar ) यानं पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
अभिनेता अविष्कार दारव्हेकर आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी व अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) हे दोघेही यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. होय, सध्या बिग बॉसच्या घरात एकत्र नांदत असलेले स्रेहा व अविष्कार कधीकाळी पती-पत्नी होते. आताश: दोघांचाही घटस्फोट झाला आहे. ताज्या एपिसोडमध्ये अविष्कार आपल्या याच स्रेहासोबतचं लग्न व घटस्फोटावर बोलला.
बिग बॉसच्या घरात सहस्पर्धक जय दुधानेशी गप्पा मारताना त्याने स्रेहासोबतच्या नात्याबद्दलचे अनेक खुलासे केलेत.
काय म्हणाला अविष्कार?
‘स्नेहा ही घरात स्पर्धक म्हणून येणार आहे हे मला माहिती नव्हते आणि मला माझ्या भूतकाळात परत जायची अजिबात इच्छा नाही. पण इतक्या वर्षांनी आम्ही दोघे एकत्र कसे राहतो, हे बिग बॉसला दाखवायचे असेल म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला एकत्र आणले असावे. बिग बॉस मराठीने मला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे आणि तो याची कदर करतो. स्रेहासोबतचा घटस्फोट माझ्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट घटना होती. स्रेहाने माझ्यावर अनेक आरोप केले होते. या घटस्फोटानंतर मी खूप दारूच्या आहारी गेलो होतो. माझा अक्षरश: ‘कबीर सिंग’ झाला होता, ’ असे अविष्कार जयला सांगतो. यावर जयला थोडं आश्चर्य वाटतं. स्रेहा घरात खूप शांत आणि समजूदार वाटते, असं जय म्हणतो. यावर ती अजिबात शांत नाही तर चांगलीच तापट आहे. वेळ आली की, तुलाही कळेल, असं अविष्कार यावर म्हणतो.
वयाच्या उणापु-या 19 व्या वर्षी स्रेहाने अविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा यावर बोलली होती. ‘ मी खूप काही सहन केलं. अखेर माझ्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या मदतीने मी यातून बाहेर पडू शकले. पतीच्या मारहाणीला बळी पडून त्यातून बाहेर पडू न शकणा-या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं,’ असं स्रेहा त्या मुलाखतीत म्हणाली होती.