बिग बॉस मराठी ३ फेम अविष्कार दारव्हेकर पुन्हा अडकला लग्नबेडीत, पत्नीचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 05:39 PM2022-08-13T17:39:45+5:302022-08-13T17:40:30+5:30
Aavishkar Darwhekar - बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमधून अभिनेता अविष्कार दारव्हेकर चर्चेत आला होता.
बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 3)च्या तिसऱ्या सीझनमधून अभिनेता अविष्कार दारव्हेकर (Aavishkar Darwhekar) चर्चेत आला होता. अविष्कारची पूर्वाश्रमीची पत्नी स्नेहा वाघ हिने देखील या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी या दोघांचे पुन्हा पॅचअप होतंय का असे प्रेक्षकांना वाटत होते. मात्र तसे काही घडले नाही. आता त्याने दुसरा संसार थाटला आहे. सोशल मीडियावर त्याचे आणि पत्नीचे फोटो समोर आले आहेत.
अविष्कारला बिग बॉसच्या घरातून खूप लवकर बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर तो सोशल मीडियापासून काहीसा दूर झाला होता. नुकतेच स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अविष्कारने आपल्या दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावरून अविष्कारने पुन्हा एकदा लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आविष्कार त्याच्या पत्नीसोबत ट्रिप एन्जॉय करत आहे. अविष्कारच्या या दुसऱ्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
स्नेहा वाघने अविष्कारच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा बिग बॉसच्या घरात काढली होती. मला दुसऱ्या लग्नाला नक्की बोलव असे तिने अविष्कारला निरोप देताना म्हटले होते. स्नेहा वाघ आणि अविष्कार बिग बॉसच्या घरात आल्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र येतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र पुन्हा एकत्र येण्यावर स्नेहाने तटस्थ भूमिका घेतली होती.
या निर्णयाबाबत ती म्हणाली होती की, ‘माझं अविष्कारासोबत खूपच कमी वयात लग्न झाले होते. काहीही कारण काढून तो मला मारहाण करायचा. माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मारहाण केल्याचे देखील अनेकांनी पाहिलेत. सगळ्यांना त्यातले सगळे माहित आहे पण कोणीही काही बोलत नव्हते. सकाळी मी अर्धमेल्या अवस्थेत तशीच सेटवर जायचे. सेटवरील लोकांनाही सर्वकाही माहित झालेले. माझी ही झालेली अवस्था तिथल्या लोकांना पाहवत नव्हती. सेटवरील लोक त्यावेळी मला खूप समजून घायचे मला वेळ द्यायचे. सेटवर माझे मन रमायचे पण संध्याकाळ झाली की मला भीती वाटायची. घरी गेल्यावर आता अविष्कार माझ्यासोबत आणखीन काय करेल या भीतीने मला घरी जायची भीती वाटायची. अविष्काराने मला खूपच त्रास दिला आहे. मी त्याने दिलेला त्रास कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी अवघ्या १७ वर्षांची होते. मी आविष्काराच्या घरातून पळून माझ्या घरी गेली होते. आता मी त्याचा विचार देखील करू शकत नाही. मी पुन्हा त्याच्याकडे परतेन किंवा आमच्यात पुन्हा काही घडेल अशी तिळमात्रही आशा कोणी बाळगू नये’.