मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक; महामार्गावर आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:34 PM2024-01-16T16:34:34+5:302024-01-16T16:35:02+5:30
महामार्गावर आपल्या आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला वाचताना अभिनेता दिसला.
मराठी अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि त्याचे कौतुकही होते आहे. अचानक महामार्गावर धावणाऱ्या एका श्वानाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी अभिनेत्याने काय केले, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेता थेट गाडीतून उतरून महामार्गावर आपल्या आईच्या शोधात लंगडत धावणाऱ्या पिल्लाला वाचताना दिसला आहे.
पिल्लाला जीवदान देणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे (utkarsh shinde) आहे. उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर विविध पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतेच त्याच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं. त्याने "फायटर' म्हणजे एका कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवतानाचा प्रसंग पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
त्याने लिहलं, '“फाईटर” वर ‘संक्रांत आली होती का? माहिती नाही. पण 'संकट' नक्कीच आल होत...छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिकरित्या माझा वाढदिवस साजरा करुन भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. गरमा-गरम हुरडा खात, गार वारा कापत प्रवास सुरु होता. हायवेवर एका मागोमाग भरधाव वेगाने वाहने धावत होती आणि तितक्यात नगर येता-येता रस्त्याच्या मधोमध दिसला एक चिमुकला “फाइटर”. एका पायाने लंगडत हायवेवर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जिवाच्या आकांताने मधोमध पळणारं घाबरलेलं वाट विसरलेलं एक चिमुकलं कुत्र्याच पिल्लू'.
उत्कर्षने लिहलं, 'आमच्या गाडी समोर फाईटर दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रसत्याच्या कडेला थांबवली. खरा काऊंटडाऊन सुरू झाला होता तो तेव्हाच. भीती होती ती आता मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये ह्याची. तसाच गाडीतून मी उतरुन उलट हायवेवर धावत रस्त्याच्या मधोमध फाईटरच्या मदतीस पोहोचलो, त्याला उचललं. पाहिल तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला ह्याची आई जवळ आसपास असेल. ह्याला इथेच झाडात सोडू,म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेन बघू लागलं'.
पोस्टमध्ये तो पुढे म्हणाला, 'एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं आणि गाडीत सोबत घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाहीना? चेक करत करत तो भूकेला असेल तहानलेला असेल आधी एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल ह्या विचाराने, त्या पिल्ला घेऊन पुढे एका द्याब्यावर थांबलो. त्याला पाणी पाजल-बिस्कीट खाऊ घातले. त्याच्या पायाला औषध लावालं आणि काही काळ आम्ही गूळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतले. काहींनी त्या पिल्लाबद्दल विचारपूस केली. मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने मी हे पिल्लू घेऊ का? मी त्याचा संभाळ करतो सर म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली'.
उत्कर्षने पुढे लिहलं, मनात विचार आला. आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी, आजच्या संकटाला हरवून एका फाईटर सारखा. निरोप घेतला... निघालो पण या घटनेतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो. मी का बर हे टेन्शन मागे लाऊन घेऊ? माझं थोडीच हे काम आहे? मला काय गरज ? आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. इट्स अ सर्कल. तुम्ही मदत करा, तुमची मदत करायला नक्कीच कोणीतरी येईल. आज तीळगूळ देऊन फक्त गोड गोड बोलायचं नाही. तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा'. उत्कर्षच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आणि त्याचं कौतुक केलं.