Bigg Boss Marathi 4: जिनिलीयानं विचारलं 'बिग बॉस'च्या घरात 'विलन' कोण?, उत्तर मिळालं अन् पिकला हशा! पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 20:17 IST2022-12-25T20:16:39+5:302022-12-25T20:17:56+5:30
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा आजचा विकेंड स्पर्धकांसाठी खूप खास ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 4: जिनिलीयानं विचारलं 'बिग बॉस'च्या घरात 'विलन' कोण?, उत्तर मिळालं अन् पिकला हशा! पाहा Video
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा आजचा विकेंड स्पर्धकांसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ख्रिसमसचं सरप्राइज देण्यासाठी 'बिग बॉस'च्या घरात आज चक्क अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख येणार आहे. 'वेड' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही 'बिग बॉस'च्या घरात पाहुणे म्हणून येणार असले तरी दोघांच्या उपस्थितीनं घरात सेलिब्रेशनचं वातावरण पाहायला मिळणार आहे. नुकतंच याचे प्रोमोही समोर आले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या 'सीझन ४' मध्ये रविवारी महेश मांजरेकरांच्या चावडीवर रितेश आणि जिनिलीया उपस्थिती लावणार आहे. दोघंही स्पर्धकांसाठी खास गिफ्ट तर घेऊन येणारच आहेत पण त्यांच्यासोबत एक गेमही खेळणार आहेत. सदस्यांसाठी काही 'क्राऊन' देण्यात येणार आहेत. यात सदस्यांना बहुमतानं कोणता 'क्राऊन' कोणत्या सदस्यासाठी योग्य ठरणार आहे याचा निर्णय घ्यावा लागणार आहेत. 'क्राऊन'वर रितेशनं काम केलेल्या सिनेमांची नावं लिहिण्यात आलेली आहेत. यातील कोणत्या सिनेमाचनं नाव कोणत्या सदस्यासाठी योग्य आहे याचा निर्णय बहुमतनानं घ्यावा लागणार आहे.
रितेशननं 'एक विलन' नावाचा सिनेमा केला होता. आता जिनिलीया सदस्यांना 'विलन'चा क्राऊन कुणाला द्यायचा हेच सदस्यांना विचारत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. सदस्यांनी बहुमतानं आरोह वेलणकरचं नाव घेण्याचं निश्चित करण्याआधी आरोहच स्वत:चं नाव घेतो. पण त्यावर अक्षय केळकरनं हजरजबाबीपणा दाखवत आरोहला तू 'विलन' नव्हे, तू तर 'वेलण'कर आहेस असं म्हटलं. त्यानंतर एकच हशा पिकलेला पाहायला मिळला.