"आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार", वर्षाताईंच्या मातृत्वावरुन निक्की बरळली, मराठी अभिनेत्याचा राग अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:01 PM2024-08-14T15:01:01+5:302024-08-14T15:01:48+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्कीने वर्षाताईंना "आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार" असं म्हटलं. निक्कीच्या या वक्तव्यानंतर अंकिताने तिला चांगलंच सुनावलं. वर्षाताईंच्या मातृत्त्वाबद्दल असं बोलल्यामुळे निक्कीला पुन्हा ट्रोल केलं जात आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच घरातील निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर हे दोन चेहरे चर्चेत आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणांवरुन घरात या दोघींमध्ये वाद होत असल्याचं दिसत आहे. या भांडणात अनेकदा निक्कीची वर्षा उसगावकर यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरल्याचं दिसलं. आता पुन्हा एकदा तिने त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
या आठवड्यात सदस्यांना घरातील दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या नाकीनऊ आल्याचं दिसत होतं. पण, निक्कीच्या टीमकडून दुसऱ्या टीमच्या बाहुल्याचे हात पाय मोडले गेले. त्यामुळे बिग बॉसने हा खेळ थांबवत घरातील सदस्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी वर्षा यांनी निक्कीला तुमच्या टीमने पाय मोडले, असं म्हणताच घरात वादावादी सुरू झाली. यावेळी निक्कीने वर्षाताईंना "आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार" असं म्हटलं. निक्कीच्या या वक्तव्यानंतर अंकिताने तिला चांगलंच सुनावलं. वर्षाताईंच्या मातृत्त्वाबद्दल असं बोलल्यामुळे निक्कीला पुन्हा ट्रोल केलं जात आहे.
मराठी अभिनेता अभिजीत केळकर यानेही पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे. "एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं...पण, वर्षा ताई तुमच्या संयमाला सलाम", असं अभिजीतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकारानंतर निक्कीने वर्षाताईंची माफीदेखील मागितली आहे. मला याबाबत माहीत नव्हतं असं म्हणत निक्कीने वर्षा उसगावकर यांची माफी मागितली. याशिवाय जे बोलले त्याबाबत मला पश्चाताप होतोय, असंही निक्की त्यांना म्हणाली.