अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:56 PM2024-09-24T12:56:26+5:302024-09-24T12:56:54+5:30
'बिग बॉस'च्या घरात जेव्हा छत्रपतींचा जयजयकार झाला, तेव्हा अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता.
Arbaz Patel on Chhatrapati Shivaji Maharaj : सध्या संपुर्ण महाराष्ट्रात 'बिग बॉस मराठी'ची ( Bigg Boss Marathi) क्रेझ आहे. 'बिग बॉस'च्या घरात असलेल्या प्रत्येक स्पर्धकावर प्रेक्षकांची नजर आहे. स्पर्धकांची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद होते आणि चुकीचे वागताच 'बिग बॉस'सह प्रेक्षकही संबधित स्पर्धकावर भडकतात. असंच काहीसं घडलं, 'बिग बॉस'मध्ये सहभागी झालेला संभाजीनगरचा अरबाज पटेल (Arbaz Patel) याच्याबाबत. 'बिग बॉस'च्या घरात जेव्हा छत्रपती शिवरायांचा जयजयकार झाला, तेव्हा अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. यावर नेटकऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाजने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आणि कमी मते पडल्याने अरबाज पटेल याला 'बिग बॉस'च्या घराचा निरोप घ्यावा लागला. घराबाहेर आल्यावर अरबाजने विविध ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. सकाळ दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजला प्रश्न विचारण्याता आला की, "पुरुषोत्तम दादा पाटील यांनी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. तेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलला नाही. तेव्हा महाराष्ट्र नाराज झाला. ही महाराष्टाराची नाराजगी तुला दूर करायची आहे का?. यावर अरबाजने आपण हे जाणूनबूजन केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
अरबाज म्हणाला, "पहिले तर खरं सांगतो, असं काही घडलं हेच मला माहिती नाही. कारण मी तसा नाहीये. संभाजी नगरमध्ये मी राहतो. आपण आज महाराजांच्यामुळेच आहोत, त्यांच्यासोबत आपण काम केलंय, तेव्हा जी माणसं होती, त्यांनी महाराजांच्या पाठीला पाठ लावून काम केलं आहे. तिकडे काय सुरू होतं, हे सगळं कधी घडलं मी ऐकलंच नाही. कारण, पुरुषोत्तम दादांना मीच नॉमिनेट केलेलं होतं. त्यामुळे तो एक विचार माझ्या मनात सुरू होता".
अरबाज पुढे म्हणाला, "धर्म धरून राहिलो असतो तर मी मराठी बिग बॉसमध्ये आलोच नसतो. अरे ते मराठी बिग बॉस आहे मला नाही जायचं तिकडे, मी हेच सांगितलं असतं. पण मी तसा व्यक्ती नाहीये. मी सगळ्याच धर्माचा आदर करतो. तसं काही नाहीये. जर लोकांना तसं वाटलंय तर मी सर्वांची माफी मागतो तुमची. पण खरंच असं काही नाहीये".
नेमकं काय घडलं होतं ?
'मराठी बिग बॉस' हे २८ जुलैला सुरू झालं होतं. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील हे घराबाहेर पडले होते. मात्र त्यांच्या एक्झिटनंतर त्यांच्यापेक्षा आरबाजची चर्चा जास्त रंगली होती. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाताना अनेक घोषणा दिल्या होत्या. सुरुवातीला संतांचा जयजयकार आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याा नावाचा जयजयकार केला. त्यांच्यापाठोपाठ घरातील इतर सदस्यांनीही घोषणाबाजी केली. मात्र अरबाज हा शांत उभा होता. अरबाजने जयजयकार न करणं चाहत्यांच्या पटलं नव्हतं. यावरुनच नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.