'बिग बॉस मराठी'च्या पैशातून छोटा पुढारीने पूर्ण केली वडिलांची इच्छा, खरेदी केली जमीन, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:39 PM2024-12-11T13:39:05+5:302024-12-11T13:39:25+5:30
घनश्यामने 'बिग बॉस मराठी' या शोमधून मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे.
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत होता. या सीझनमध्ये छोटा पुढारी म्हणून नावलौकीक मिळवलेला घनश्याम दरवडेदेखील सहभागी झाला होता. घनश्यामने त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र, अर्ध्यावरच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं. त्याला 'बिग बॉस मराठी ५'च्या फायनलपर्यंत पोहोचता आलं नाही. पण, त्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. आता घनश्यामने चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
घनश्यामने 'बिग बॉस मराठी' या शोमधून मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे. युट्यूबवर व्हिडिओ शेअर करत घनश्यामने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडिओत छोटा पुढारी म्हणतो, "आज मी खूप खूश आहे. बिग बॉसमधून मिळालेल्या पैशाचं काय केलं? असे सगळेच मला विचारायचे. या पैशातून काहींनी दागदागिने केले, काहींनी हे पैसे गुंतवले, कुणी घरं बांधली. आज सगळ्यांनी मी आनंदाची बातमी सांगतो. या पैशातून मी जागा घेतली".
त्यानंतर छोटा पुढारी त्याच्या आईची प्रतिक्रिया घेतो. "मला खूप छान वाटतंय. आम्ही जागा घनश्यामच्या नावावर केली. तो म्हणत होता की मम्मी तुझ्या नावावर कर. पण, मी म्हटलं नाही...घनश्याम तुझी कमाई आहे. तुझ्या कष्टाची कमाई आहे. त्यामुळे तुझ्याच नावावर जागा घे", असं घनश्यामची आई म्हणते. गावात स्वत:च्या मालकीची जमीन असावी, अशी घनश्यामच्या वडिलांची इच्छा होती. बिग बॉसमधून मिळालेल्या पैशातून त्याने ही जमीन खरेदी करत वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे.