'बिग बॉस मराठी'ने TRP रेकॉर्ड मोडल्यानंतर जिनिलीयाला रितेशचं कौतुक, म्हणते- "जेव्हा कळलं तू होस्ट करणार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 05:55 PM2024-08-17T17:55:54+5:302024-08-17T17:56:38+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात ३.२ TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. भाऊच्या धक्क्याने टीआरपीचा इतिहास रचल्यानंतर जिनिलीयाने रितेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी पाचवा नवा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीचा होस्टही बदलण्यात आला. यापूर्वी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर बिग बॉस मराठी होस्ट करताना दिसायचे. पण, या सीझनला मराठी बिग बॉसचा होस्ट बदलण्यात आला आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करतो. भाऊच्या धक्क्यावर रितेश त्याच्या स्टाइलने घरातील सदस्यांची शाळाही घेताना दिसतो.
बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन टीआरपीच्या शर्यतीतही पुढे गेला आहे. तर रितेशच्या भाऊच्या धक्क्यालाही प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात ३.२ TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत २.४ TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग २.८ TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.
भाऊच्या धक्क्याने टीआरपीचा इतिहास रचल्यानंतर जिनिलीयाने रितेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलीयाने नवरोबाचं कौतुक केलं आहे. "जेव्हा तू मला बिग बॉस मराठी होस्ट करणार असल्याचं सांगितलं होतंस, तेव्हा मला माहीत होतं की तू चांगलंच करणार. पण, तू रेकॉर्ड ब्रेक केलास. नवरोबा, मला तुझा गर्व आहे", असं जिनिलीयाने म्हटलं आहे.
दरम्यान, यंदाच्या आठवड्यात कॅप्टन झाल्यामुळे अरबाज या आठवड्यासाठी सेफ आहे. तर योगिता चव्हाण, निखिल दामले, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोणत्या सदस्याचा प्रवास या आठवड्यात संपणार हे पाहावं लागेल.