"महेश दादाला बिग बॉससाठी फोन केला होता, पण...", केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले- "काही निर्णय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:11 PM2024-10-11T12:11:45+5:302024-10-11T12:12:10+5:30
महेश मांजरेकरांऐवजी रितेशला बिग बॉस मराठीचा होस्ट केल्याने सुरुवातीला प्रेक्षक नाराज होते. यावर पहिल्यांदाच केदार शिंदेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे.
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. या पर्वात बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्रायजेस चाहत्यांना मिळाले. मराठमोळ्या रितेश देशमुखने त्याच्या स्टाइलने बिग बॉस मराठीचं होस्टिंग करत रंगत आणली. त्याच्या होस्टिंगने भाऊचा धक्कादेखील गाजवला. पण, महेश मांजरेकरांऐवजी रितेशला बिग बॉस मराठीचा होस्ट केल्याने सुरुवातीला प्रेक्षक नाराज होते. यावर पहिल्यांदाच केदार शिंदेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं आहे.
केदार शिंदेंनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी रितेश देशमुखला होस्ट करण्यापूर्वी महेश मांजरेकरांना फोन केल्याचा खुलासाही केला. ते म्हणाले, "काही निर्णय हे एका चॅनेल किंवा नेटवर्कचे असतात. महेश दादा बिग बॉस मराठी होस्ट करणार नाहीत हे कळल्यानंतर मी स्वत: त्याला फोन केला होता. मी महेश दादाबरोबर बोललो होतो. त्यानंतर महेश दादा माझ्या सही रे सहीच्या ४४४४ व्या प्रयोगालादेखील आला होता. महेश मांजरेकर आणि केदार शिंदेचं पण एक वैयक्तिक नातं आहे. उद्या केदार शिंदे कलर्स मराठीसाठी त्याच्याकडे विचारायला गेला तर हा त्याचा निर्णय असेल की माझ्याबरोबर काम करायचं की नाही. पण, याचा अर्थ मी विचारलंच नाही असा नाही".
पुढे ते म्हणाले, "कोणीही कोणाला असं बाजूला करत नाही. प्रत्येक जण आपापली योग्यता जाणून असतो. आपण एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो. त्यामुळे एकमेकांची तोंड तर आपल्याला बघायलाच लागणार आहेत. कधी माझी गरज त्यांना लागेल. कधी माझी गरज त्यांना लागेल. आम्ही एका कुटुंबातील लोक आहोत. त्यामुळे आपण जसं आपल्या नातेवाईकांना सांभाळतो, हे त्याच पद्धतीचं आहे".