'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:31 AM2024-09-19T10:31:40+5:302024-09-19T10:32:23+5:30
अखेर केदार शिंदेंनी सांगितलं रितेश देशमुखला बिग बॉसचा होस्ट करण्यामागचं कारण, म्हणाले- "महेशदादाला..."
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सीझनमध्ये अनेक सरप्रायजेस मिळाले. याची सुरुवातच बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यापासून झाली. पहिले चार सीझन महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठी होस्ट केल्यानंतर अचानक पाचव्या सीझनला रितेश देशमुख हा शो होस्ट करताना दिसला. पण, बिग बॉस मराठीचा होस्ट का बदलला? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर कलर्स मराठी वाहिनीचे हेड केदार शिंदे यांनी याबाबत मौन सोडलं आहे.
महेश मांजरेकर त्यांच्या खास पद्धतीने घरातील सदस्यांची शाळा घ्यायचे. त्यांचं होस्टिंगही प्रेक्षकांना आवडत होतं. पण, पाचव्या सीझनला होस्ट बदलल्याने चाहतेही संभ्रमात होते. पहिल्या दिवसापासूनच रितेश देशमुख आणि महेश मांजरेकर यांची तुलनाही होऊ लागली होती. या सगळ्यावरच केदार शिंदेंनी अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मत मांडलं आहे. बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्याबाबत केदार शिंदे म्हणाले, "जुलैमध्ये बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाला. पण, संपूर्ण टीम फेब्रुवारीपासून काम करत होती. हा काळ खूपच आव्हानात्मक होता. कारण, याआधी झालेले बिग बॉस मराठीचे चार सीझन प्रेक्षकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते. टीआरपीमध्ये ते सगळे सीझन १.७-१.८ च्या अॅव्हरेजमध्ये होते. आज तोच अॅव्हरेज ३.५-३.७ पर्यंत आहे. भाऊचा धक्का तर ४.७ रेटिंगपर्यंत पोहोचला आहे. यासाठी तुम्हाला उत्तम कास्टिंग आणि रितेश देशमुखसारखा होस्ट मिळावा लागतो".
"महेशदादा बद्दल मला अत्यंत प्रेम आणि जिव्हाळा आहे. पण, यावर्षीचा बिग बॉस तरूण हवा होता. २०२४च्या दृष्टीने तो तरुण असायला हवा होता. त्यामुळे रितेश देशमुख यांच्याकडे आम्ही गेलो. आणि ते स्वत: देखील बिग बॉसचे फॅन असल्यामुळे ते उत्तम करत आहेत. पहिल्या दिवसापासून महेश दादा आणि रितेश देशमुख यांच्यामध्ये तुलना होणारच होती. पण, सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा आणि सचिन तेंडुलकरही वाईट खेळत नव्हता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सचिन चांगला खेळतो तर रोहित आणि विराट वाईट खेळत नाहीत. शेवटी प्रत्येकाची एक स्टाइल असते. आणि रितेश भाऊंनी त्यांच्या स्टाइलने भाऊचा धक्का सादर करतात", असंही केदार शिंदे म्हणाले.