मराठी अभिनेत्याचं भारताच्या लोकशाहीबाबत मोठं विधान, म्हणतो- "सूरजला सोशल मीडिया आणि एका रिॲलिटी शोमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:26 IST2024-09-28T13:25:54+5:302024-09-28T13:26:42+5:30
मराठी अभिनेत्याने सूरजसाठी खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्याने भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मराठी अभिनेत्याचं भारताच्या लोकशाहीबाबत मोठं विधान, म्हणतो- "सूरजला सोशल मीडिया आणि एका रिॲलिटी शोमुळे..."
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या सूरज चव्हाणला पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांचा फुल सपोर्ट मिळत आहे. अनेक सेलिब्रिटीही सूरजला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता मराठी अभिनेता अभिजीत केळकरने सूरजसाठी खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना अभिजीतने भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अभिजीत सुरुवातीपासूनच सूरजला पाठिंबा देत आहे. त्याच्या खेळाचं कौतुक करणाऱ्या अनेक पोस्टही त्याने केल्या होत्या. आता मात्र अभिजीतने केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "जी आर्थिक आणि सामाजिक समानता, संधी...७५ वर्षांची आपली लोकशाही देऊ शकली नाही. ती सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअॅलिटी शोने दिली", असं अभिजीतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज त्याच्या खेळीने आणि घरातील कृतींनी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. सूरजला पहिल्यांदा बिग बॉस मराठीच्या घरात बघून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बिग बॉस मराठीला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, आता मात्र त्याला चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी सूरजने जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.
बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांच्या सीझनचा प्रवास ७० दिवसांतच संपणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या सदस्यांमध्ये ट्रॉफीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.