"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:02 PM2024-09-30T18:02:51+5:302024-09-30T18:03:32+5:30
पॅडीच्या एक्झिटनंतर त्याचे चाहतेही नाराज झाले. पॅडीने 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना रविवारी पंढरीनाथ कांबळेला घरातून एक्झिट घ्यावी लागली. सुरुवातीला शांत दिसणाऱ्या पॅडीने नंतर त्याच्या उत्तम खेळीने आणि हुशारीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यामुळेच पॅडीच्या एक्झिटनंतर त्याचे चाहतेही नाराज झाले. पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पॅडीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी पॅडीच्या खेळाचं कौतुक केलं आहे. "तू ट्रॉफी नाही पण सगळ्यांच प्रेम भरभरून जिंकून गेलास" असं त्यांनी म्हटलं आहे.
अंशुमन विचारेच्या पत्नीची पोस्ट
बिग बॉस चा खेळ खरंच आयुष्य शिकऊन जातो नाही...
म्हणजे बघा ना एका चांगल्या माणसाला सतत त्याच्या चांगुलपणाचा पुरावा दयावा लागतो आणि आयुष्यभर तो स्वतःला prove करतंच वेळ घालवतो ...आणि तरीही लोक त्याच्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीत.
अहो लोकांचं जाऊदे बऱ्याचदा जन्मदाते आईबाबा सुद्धा चांगल्या मुलाचीच परीक्षा घेत राहतात कधीच त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत नाहीत...
चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते. आपण कितीही काही म्हटलं तरी हेच अंतिम सत्य आहे ....
असंच काहीतरी झालंय पॅडी दादा तुझ्यासोबत...पण एकच सांगेल तू ट्रॉफी नाही पण सगळ्यांच प्रेम भरभरून जिंकून गेलायस...नेहमीप्रमाणेच...
दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. पॅडीने एक्झिट घेतल्यानंतर आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.