Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 09:55 IST2024-07-24T09:54:55+5:302024-07-24T09:55:49+5:30
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'साठी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचं पर्व मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे. "वेड लावणारं प्रेम तर याच्या कडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?" अशी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टबरोबर रितेश देशमुखच्या वेड सिनेमातील वेड लावलंय हे गाणंही देण्यात आलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या या अभिनेत्याबद्दल अंदाज लावले आहेत.
अनेकांनी वेड सिनेमात रितेशबरोबर काम केलेल्या शुभांकर तावडेचं नाव कमेंट केलं आहे. तर अजून काही दोन तीन अभिनेत्यांची नाव घेत चाहत्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये आकाश ठोसर, प्रथमेश परब या कलाकारांची नावही कमेंट करण्यात आली आहेत. पण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेता शुभांकर तावडे दिसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शुभांकर तावडेबरोबरच आणखी काही स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. वर्षा उसगावकर, मानसी नाईक, प्रणव रावराणे हे कलाकार 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसण्याची शक्यता आहे. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरदेखील यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.