सूरज चव्हाणच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून पैशांची मागणी; स्वत: उघडकीस आणलं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:44 PM2024-10-14T14:44:12+5:302024-10-14T14:48:33+5:30
सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे.
Suraj Chavan : गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बारामती येथील मोढवे नावाच्या खेडे गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साध्याभोळ्या स्वभावाने महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. 'बिग बॉस'च्या घरांमध्ये असताना सूरजने अनेक गोष्टींचे खुलासे केले होते. सूरजला लिहता-वाचता येत नसल्यामुळे अनेकांनी त्याला फसवलं आहे, असं त्याने सांगितलं. अशातच 'बिग बॉस' मराठीचा विजेता ठरल्यानंतर त्याच्या नावे सोशल मीडियावर चाहत्यांची फसवणूक करण्यात येत आहे. स्वत: सूरजने हे प्रकरण उडकीस आणून चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. याबद्दल त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
सूरज चव्हाणच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलंय, "नमस्ते, मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यामध्ये आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत, दिलेला कोड स्कॅन करून पैसे पाठवा. त्याच्यापर्यंत निश्चित ही आर्थिक मदत आम्ही पोहोचवू. अशा पद्धतीच्या या सगळ्या पोस्ट आहेत. माझ्या नावाचे फेक आयडी बनवून या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला चाहत्यांनी बळी पडू नये ही माझी विनंती आहे. जे कोणी अशा पोस्ट शेअर करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."
या पोस्टच्या माध्यमातून सूरजने नेटकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाल्यानंतर सूरजच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान त्याच्या लोकप्रियतेचा सायबर भामटे फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय.