Bigg Boss Marathi: या कारणामुळे मेघा आणि पुष्करमध्ये पुन्हा होणार वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:23 PM2018-07-06T12:23:17+5:302018-07-06T12:25:33+5:30
पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. मेघाने काल सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना हे देखील स्पष्ट केले कि, आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही.
मराठी बिग बॉस हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रसिकांचा आवडता शो बनत चालला आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, कुरघोडीची स्पर्धा, डावपेच, टास्क आणि कधी इमोशनल ड्रामा यामुळे रसिकांना हा शो भावतोय. घरामध्ये काल देखील “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य रंगले. सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचे होते. मात्र काल टीम्समध्ये अदलाबदल करण्यात आली. टीम सून - जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक यांनी केले. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सई मध्ये तर मेघा आणि पुष्कर मध्ये बरेच वाद झाले. रेशमने स्मिताला दिलेली सगळी कामे तिने उत्तमरीत्या पार पाडली. ज्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले त्यांना हिरे देण्यात आले. मेघा, सई आणि पुष्कर यांचे त्रिकुट प्रेक्षकांना चांगलेच आवडत होते. पण गेल्या आठवड्यापासून त्यांच्यामध्ये बरेच वाद होत आहेत. हे वाद काल देखील दिसून आले. सईला मेघाचे म्हणणे पटत नाही तर पुष्करला मेघाचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाही. आज देखील हा वाद विकोपाला जाणार असून पुष्कर, मेघा, सई, आस्ताद आणि रेशम यांच्यामध्ये बरेच वाद होणार आहेत. परंतु या वादामध्ये नक्की कोण माघार घेईल ? घराचा नवा कॅप्टन कोण होणार ? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बरेच वाद विवाद होत आहेत. ज्यामध्ये पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. मेघाने काल सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना हे देखील स्पष्ट केले कि, आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही. तसेच काल “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यामध्ये घरातील सदस्यांनी बरेच हिरे देखील जिंकले.आज कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी मेघा, शर्मिष्ठा, स्मिता आणि नंदकिशोर मध्ये वाद होणार आहेत. नंदकिशोर यांचे म्हणणे असणार आहे कि, मेघा आणि शर्मिष्ठा दिलेला टास्क नीट खेळल्या नाही. मेघाला आज आस्ताद, रेशम, पुष्कर, सई यांच्या रागाला सामोरं जावं लागणार आहे. मेघाने जे काही पुष्करसोबत केले ते चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे असणार आहे.
आज घरामध्ये कॅप्टनसीच्या निवडीचे कार्यही पार पडणार आहे.महेश मांजरेकर यांनी दर आठवड्याला या घरामध्ये स्पर्धेबरोबरच खेळाडूवृत्ती देखील तितकीच महत्वाची आहे असे नेहेमीच नमूद केले आहे.म्हणून या आठवड्याचे कॅप्टनसीचे कार्य महेश मांजरेकर यांनी आखून दिले आहे. आज घरामध्ये हटके पद्धतीने पूल वॉलीबॉल खेळण्यात येणार आहे. या कार्यानिमित्त घरातील सदस्यांची चार टीम्समध्ये विभागणी करण्यात येणार आहे. तेंव्हा आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनेल हे बघणे रंजक असणार आहे.