लोकांचे टोमणे ऐकले, हातच्या भूमिका गेल्या; आरती सोळंकीने घटवलं 50 किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:40 PM2023-10-08T16:40:00+5:302023-10-08T16:40:00+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने घटवलं ५० किलो वजन; पाहा तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
गेल्या काही काळामध्ये अनेक अभिनेत्रींनी झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढला आहे. त्यामुळे आज कलाविश्वात कलाकारांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या टॅलेंटला जास्त महत्त्व दिलं जात आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा अनेक अभिनेत्रींना त्यांच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं जायचं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. लोकप्रिय विनोदवीर म्हणून आरतीने मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु, तिच्या वाढत्या वजनामुळे तिच्या हातून अनेक प्रोजेक्टही गेले. इतकंच नाही तर अनेकांनी तिला टोमणे सुद्धा मारले. मात्र, आरतीने आता तब्बल ५० किलो वजन घटवलं असून तिचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन सध्या चर्चेत आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर आरतीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन तिच्यात झालेलं ट्रान्सफर्मेशन स्पष्टपणे दिसून येत आहे. वजन कमी करण्याच्या या प्रवासाबद्दल आरतीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कशाप्रकारे तिचं वजन १३२ किलो वरुन ८२ किलो केलं हे सांगितलं आहे.
वाढलेल्या वजनामुळे तिला लोकांचे खूप टोमणे ऐकायला लागले. अनेक चांगले प्रोजेक्ट्स तिच्या हातून गेले. त्यानंतर तिने वजन कमी करायचं ठरवलं. आतापर्यंत तिने ५० किलो वजन घटवलं आहे. मात्र, हे वजन तिला आणखी कमी करायचं आहे. "वजन कमी झाल्यामुळे खूप सकारात्मक वाटतंय. जवळचे लोकही कौतुक करतायेत. माझे आधीचे फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यानंतर खूप फरक जाणवतोय," असं ती या वेटलॉस जर्नीविषयी सांगताना म्हणाली.
कसं कमी झालं आरतीचं वजन?
आरतीने २०२१ पासून तिच्या वेटलॉस जर्नीला सुरुवात केली. नियमित वर्कआऊट, दररोज ७ ते ८ तास चालणे, योग्य डाएट, असं करुन आरतीने तिचं वजन ५० किलो कमी केलं आहे. तिचं आधीचं वजन १३२ किलो होतो. दरम्यान, आरती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र, पहिल्याच आठवड्यात ती बेघर झाली. त्यानंतर ती काही रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.