जेव्हा गिरगांवकर पडतो ठाणेकरच्या प्रेमात..; शर्मिष्ठासाठी नवऱ्याने सोडलं कायमचं घर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 11:42 AM2023-08-20T11:42:30+5:302023-08-20T11:42:57+5:30
Sharmishtha raut: शर्मिष्ठासोबत लग्न करण्यासाठी तेजस एका पायावर तयार होता.
प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणत अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होतात. त्यामुळे आज हिर-रांझा, रोमियो-ज्युलिएट यांच्यासारख्या कितीतरी लव्हस्टोरी गाजल्या आहेत. विशेष म्हणजे आजच्या काळातही अनेक जोडप्यांनी समाजासाठी काही आदर्शही निर्माण केला आहे. विशेष म्हणजे प्रेमात कायम तरुणीनेच तडजोड करायची असते असं काही नाही. काही वेळा, तरुणदेखील आपल्या प्रेमासाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमाची, तिच्या लग्नाची गोष्ट चर्चिली जात आहे. या अभिनेत्रीसाठी तिच्या नवऱ्याने चक्क त्याचं घर सोडलं.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha raut). बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) घरात झळकलेली शर्मिष्ठा सारंकाही तिच्यासाठी या नव्या मालिकेत झळकत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने अलिकडेच 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी त्याचं घर सोडलं असं सांगितलं.
तुला सगळं ठाण्यातच मिळालं का? असा प्रश्न आदेश बांदेकरांनी शर्मिष्ठाला विचारला. त्यावर हसत हसत तिने हो असं उत्तर दिलं. सोबतच तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी गिरगांव सोडलं असंही सांगितलं.
"आमचं अरेंज मॅरेज झालंय. आता २ वर्षांपूर्वी जेव्हा आमचं लग्न ठरत होतं त्यावेळी मी त्याला सांगितलं होतं की, सगळं काही तर ठीक आहे. पण, मी ठाणे सोडून कुठेही जाणार नाही. ही माझी एकच अट होती. तर काय करु शकतो? तो म्हणाला ठीक आहे. काहीच अडचण नाही. मग तो माझ्यासाठी त्याचं सगळं गिरगाव मागे सोडून ठाण्याला रहायला आला", असं शर्मिष्ठा म्हणाली.
दरम्यान, शर्मिष्ठाने ११ ऑक्टोबर २०२० मध्ये तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली. शर्मिष्ठा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बिग बॉस मराठीसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'जुळून येती रेशीमगाठी', 'हे मन बावरे', 'अबोली' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.