'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री; दिसणार पोलिसाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:29 AM2024-05-17T09:29:46+5:302024-05-17T09:30:48+5:30
अनेक रिएलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या जय दुधाणेची आता मालिकेत एन्ट्री झाली आहे. पोलिसाच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बिग बॉस मराठी' या रिएलिटी शोमधून जय दुधाणे घराघरात पोहोचला. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात तो सहभागी झाला होता. या पर्वाच्या टॉप ३ फायनलिस्टमध्ये जयचं नाव होतं. 'बिग बॉस'आधी जयने MTV स्प्लिट्सविला या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोचा तो विजेता ठरला होता. अनेक रिएलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या जय दुधाणेची आता मालिकेत एन्ट्री झाली आहे.
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून जय दुधाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुन्हा एकदा मालिकेच्या निमित्ताने जयचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. जय स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून जय मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जयचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जय आणि विशाल आमनेसामने असणार आहेत. या मालिकेत जय दुधाणे इन्स्पेक्टर जय घोरपडे तर विशाल निकम रायाच्या भूमिकेत दिसणार आहे. २७ मे पासून रात्री १० वाजता ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, "मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे".