'बिग बॉस' मराठी फेम शिव ठाकरेचं टेलिव्हिजनवर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:30 AM2019-12-22T06:30:00+5:302019-12-22T06:30:00+5:30
अभिनेता शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधून खूप लोकप्रिय झाला आहे.
सोनी मराठीवर नुकताच सुरू झालेला कार्यक्रम म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा'. लोककलांवर आधारित या कार्यक्रमात दर आठवड्याला एक लोककला सादर केली जाते. त्या लोककलेची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. लोककलांना समर्पित या उत्सवाचा हा आठवडा खास होणार आहे तो कोळी नृत्याच्या सादरीकरणाने. विशेष म्हणजे कोळी नृत्यावर होणाऱ्या सादरीकरणात दर्याराजाला साद घालायला आपल्या सगळ्यांचा लाडका शिव ठाकरे 'जय जय महाराष्ट्र माझा'च्या मंचावर येणार आहे.
कोळी पेहराव परिधान करून कोळ्यांच्या नृत्याची खास शैली शिव ठाकरे आणि चेतना भट सादर करणार आहेत. जितेंद्र तुपे हे त्याचसाठी आहेत. 'नारळी पुनवेचे पारो, नारळी पुनवेचा सण आणि दर्या रे माझ्या सागरा रे' या गाण्यांवर ही जोडी कोळी नृत्य सादर करणार आहे.
तेव्हा जितेंद्र तुपे यांची गायकी आणि शिव ठाकरे-चेतना भट यांचा नृत्याविष्कार पाहायला विसरू नका सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर.
महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठीचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राने आजवर जपलेल्या परंपरांचं, संस्कृतीचं आणि लोककलांचं सिंहावलोकन होणार आहे. पारंपरिक लोककलांनी नटलेला हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांमधील लोककला पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे.
सुबोध भावे आतापर्यंत अनेक रूपात प्रेक्षकांसमोर आलेला आहे पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूत्रसंचालकच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. ज्या लोककलांनी महाराष्ट्र घडला, एक झाला अशा शाहीरी, लावणी, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, वासुदेवसारख्या विविध लोककलांचा आविष्कार या मंचावर पाहता येणार आहे.