आले तुफान किती, जिद्द ना सोडली! सूरज स्वत: बांधतोय 'बिग बॉस'चा बंगला, व्हिडिओतून दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:59 IST2024-12-27T15:58:46+5:302024-12-27T15:59:02+5:30
सूरजने त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आले तुफान किती, जिद्द ना सोडली! सूरज स्वत: बांधतोय 'बिग बॉस'चा बंगला, व्हिडिओतून दाखवली झलक
प्रसिद्ध रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण यंदाच्या 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभागी झाला होता. उत्तम खेळ आणि साधेपणाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकत बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर सूरजने त्याच्या गावात स्वत:चं घर बांधण्याची इ्च्छा व्यक्त केली होती. या घराला बिग बॉस असं नाव देणार असल्याचंही तो म्हणाला होता. सूरजची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
सूरजने त्याच्या नव्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून सूरजच्या नव्या घराची छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. सूरज स्वत: त्याचं हे नवीन घर बांधत आहे. व्हिडिओमध्ये तो घराच्या बांधकामाला पाणी देताना दिसत आहे. "माझं घर...लवकरच बिग बॉसचा बंगला", असं कॅप्शन सूरजने या व्हिडिओला दिलं आहे.
सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. "ज्याला कष्टाची लाज नाही तो व्यक्ति आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "शून्यातून विश्व निर्माण करणारा आमचा सूरज दादा", असं म्हटलं आहे. "जिथे तू खूप स्वप्न पाहिलीत त्या जागी तुझा बंगला उभा राहतोय खूप छान वाटत आहे", "हे दिवस बघायला सूरज च आई वडील आसायला पाहिजे होते", अशा कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, सूरजच्या आयुष्यावर सिनेमादेखील येणार आहे. केदार शिंदेंनी 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेला त्याच्यावर सिनेमा काढणार असल्याची घोषणा केली होती. 'झापुक झुपूक' असं त्याच्या सिनेमाचं नाव असणार आहे.