'तुझं असणं मला आधार वाटून गेलं'; मीरासाठी विशालची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 19:14 IST2023-06-16T19:13:07+5:302023-06-16T19:14:44+5:30
Vishal nikam: बिग बॉसच्या घरात मीरा आणि विशाल एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखेच वागत होते.

'तुझं असणं मला आधार वाटून गेलं'; मीरासाठी विशालची खास पोस्ट
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). या कार्यक्रमाचे आतापर्यंत चार पर्व पार पडले असून प्रत्येक पर्व तितकंच लोकप्रिय ठरलं आहे. यामध्येच बिग बॉस मराठी ३ चं पर्व सर्वात जास्त गाजलं. हे पर्व संपून आता बराच काळ झाला आहे. मात्र, त्यातील स्पर्धक आणि विजेत्यांची आजही चर्चा रंगते. अलिकडेच या पर्वाचा विजेता विशाल निकम याने अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.
"लास्ट सीजनमधील अनुभव पाहता आपली मैत्री इतकी खास होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्या सीजनमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात उभे होतो, कचाकचा भांडत होतो. पण हा सीजन कमालीचा वेगळा ठरला. बिग बॉस चारच्या घरातली आपली एंट्री झाली तेव्हा, तुझं असणं मला आधार वाटून गेलं. माझ्या कुटुंबातली एक सदस्य माझ्यासोबत आल्याचे समाधान मिळाले", असं म्हणज विशालने मीरासोबतचा फोटो शेअर केला आहे. विशालची ही पोस्ट जुनी असली तरीदेखील सध्या ती चर्चेत येत आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात मीरा आणि विशाल एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखेच वागत होते. त्या दोघांचं कोणत्याच गोष्टीसाठी एकमत झालं नाही. त्यामुळे या घरात त्यांच्यात कायम ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, हा सीझन संपल्यानंतर या दोघांमध्ये या घरातील अनेक स्पर्धक एकमेकांचे छान मित्र झाले असून त्यांनी त्यांची मैत्री जपलेली आहे. अलिकडेच बिग बॉस ४ मध्ये हे दोघं सात दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात गेले होते.