"चुका सुधारण्यात तू स्वत:ला विसरली..."अभिजीत-निक्कीने जान्हवीला सांगितली सत्य परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:12 IST2024-09-24T13:06:51+5:302024-09-24T13:12:13+5:30
'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन हा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

"चुका सुधारण्यात तू स्वत:ला विसरली..."अभिजीत-निक्कीने जान्हवीला सांगितली सत्य परिस्थिती
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन हा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या सीझनमध्ये रोजच धमाल पाहायला मिळते आहे. पण, असं असलं तरी जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या जान्हवीला घरात अरेरावी आणि सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. पॅडीचा अपमान केल्यामुळे जान्हवीला रितेशने एक आठवडा तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली होती. याबरोबरच जान्हवीला भाऊच्या धक्क्यावरही रितेशने स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे जान्हवीला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अशातच जान्हवीचं अचानक बदललेलं रूप पाहून अभिजीत-निक्की तिला रिअॅलिटी दाखवत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल समोर आला आहे.
सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'चा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत जान्हवीला म्हणतो, "तू इतकं प्रेशर घेतलं ना की ताईंबरोबर तू असं वागलीस किंवा जे काही चूकीचं वागली या सगळ्या गोष्टींचा तू प्रचंड ताण घेतला. एक कलाकार म्हणून असं होणं सहाजिकच आहे. तुझ्या चुका झाल्या पण तू या चुका मिटवण्याच्या नादात घराला विसरली. शिवाय या प्रयत्नात तू स्वत: लाही विसरली. त्यामुळे तू घरात तुझं महत्व कमी केलंस. असं निक्की-अभिजीत जान्हवीला सांगतात. पुढे अभिजीत म्हणतो, नॉमिनेशच्या भीतीमुळे तू हे सगळं केलंस. तुला हे चांगलच माहित होतं की तुला या सगळ्या वेळेमध्ये काही करता नाही आलं जे तुला करायला पाहिजे होतं". असं म्हणत व्हिडीओमध्ये निक्की-अभिजीत जान्हवीला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात.
निक्की-अभिजीतला उत्तर देताना जान्हवी म्हणते, "सूरज, वर्षाताई आणि निक्की-अरबाज हे सगळे स्ट्रॉंग स्पर्धक माझ्यासमोर होते आणि त्यावेळी मी नॉमिनेशमध्ये असल्यामुळे मी घाबरले होते. कारण माझ्या ऑडियन्सने मला कुठल्या लेव्हलला नेऊन ठेवलंय याचा मला अंदाज नव्हता म्हणून मी घाबरले होते".