अरबाज विचारतो पंचावन्न म्हणजे 'Ninety five' का? प्रेक्षकांनी धारेवर धरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:54 AM2024-08-14T09:54:38+5:302024-08-14T09:56:10+5:30
'बिग बॉस मराठी'चा पाचवं पर्व चांगलेच चर्चेत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवं पर्व चांगलेच चर्चेत आहे. एकामागोमाग एक नवे ट्विस्ट रोज बिग बॉसच्या घरात सदस्यांना मिळत आहेत. त्यामुळे हे पर्व खऱ्या अर्थाने रोमांचक होत चालले आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात मालवणी भाषेवरून वाद निर्माण झाला होता. तर आता अरबाज पटेल (Arbaz Patel) हा ५५ आणि ९५ यात गोंधळल्याचं दिसून आलं. अरबाजला ५५ म्हणजे किती हे न कळाल्याने त्याला नेटकरी ट्रोल करत आहे.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात बाहुल्यांरुपी बाळांचं आगमन झालं होतं. या बाळांची सेवा करण्यासाठी 'बिग बॉस'ने घरात दोन गट पाडले. 'ए' टीममध्ये अरबाज, जान्हवी, निक्की, घन:श्याम हे सदस्य राहिले. तर 'बी' टीममध्ये अंकिता, अभिजीत, वर्षा, निखिल, पंढरीनाथ हे सदस्य होते. तर वैभव आणि आर्या या टास्कचे संचालक करण्यात आलं. घरात दोन्ही चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर देण्यात आली.
या टास्कमध्ये सदस्यांकडून नियमांचं पालन झालं नाही. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे दिसून आले. घरातील सदस्यांमध्ये बाळांना घेऊन झटापटही झाल्याचे दिसून आले. यात बाळाच्या बाहुलीचे नुकसान झाले. त्यामुळे बिग बॉसने नाराजी व्यक्त केली आहे. टास्क रद्द केला. तरी देखील बिग बॉस कडून या टास्कमधला विजेता घोषित झाला. टीम 'ए' टास्कमध्ये विजेता झाली.
या टास्कमध्ये टीम 'ए'कडे ५५ हजार इतकी बीबी करन्सी शिल्लक राहिली होती. तर टीम 'बी'कडे फक्त १५ हजार बीबी करन्सी होती. बीबी करन्सीबद्दल बोलत असताना अरबाज हा ५५ आणि ९५ या आकड्यात गोंधळल्याचं दिसून आलं. वैभव बिग बॉसला सांगतो की, टीम 'बी'कडे फक्त पंधरा हजार बीबी करन्सी आहे. तर आर्या बिग बॉसला सांगते. टीम 'ए'कडे ५५ हजार करन्सी आहे. यावर अरबाज गोंधळून वैभवला विचारतो की , ५५ म्हणजे 'Ninety five ' का?. अरबाजला ५५ आणि ९५ यातला फरक न कळाल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली आहे.