'बिग बॉस' मधून बाहेर पडताच वर्षा उसगांवकरांची पोस्ट, म्हणाल्या - "तुमची 'वंडर गर्ल' आता..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 10:05 AM2024-10-04T10:05:05+5:302024-10-04T10:12:42+5:30
'बिग बॉस'च्या घरातील वर्षा उसगांवकरांचा ६७ दिवसांचा हा प्रवास इथेच थांबला आहे.
Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. पण, आता हा शो अंतिम टप्प्यावर आला आहे. त्यातच प्रेक्षकांना एकामागोमाग नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अगदी 'बिग बॉस मराठी' च्या घरात काल ३ ऑक्टोबरला मिडवीक इविक्शन पार पडलं. अभिनेत्री वर्षा उसगांवकर या आठवड्यात नॉमिनेट होत्या. ग्रॅड फिनाले अवघ्या तीन दिवसांवर असताना महाराष्ट्राच्या 'वर्डर गर्ल'चा या पर्वातील प्रवास संपला आहे. वर्षा उसगांवकरांच्या चाहत्यांसाठी हा निर्णय धक्कादायकच होता.
'बिग बॉस'च्या घरातील वर्षा उसगांवकरांचा ६७ दिवसांचा हा प्रवास इथेच थांबला आहे. अशातच घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे. मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही, तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो".
पुढे वर्षा उसगावकरांनी म्हटलंय, "तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शो मधुन तुमचा निरोप घेत आहे. पण, मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील ! माझ्या प्रिय प्रेक्षकांना, प्रेम आणि फक्त प्रेम..!"
वर्षा उसगांवकर 'बिग बॉस'मधून बाहेर-
वर्षा यांनी त्यांच्या रंगतदार खेळीने 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मजल मारली होती. वर्षा यांनी प्रत्येक टास्कमध्ये वयाचा विचार न करता उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं.
या आठवड्यात निक्की तांबोळीने तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारल्याने फायनलमध्ये निक्कीने तिचं स्थान पक्क केलंय. त्यामुळे या आठवड्यात निक्की सोडून वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सहा जण नॉमिनेट होते. अखेर वर्षा यांना कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर जावं लागलं आहे.