टिकटॉकमधून पैसै मिळायचे, पण सूरजला लोकांनीच दिला 'गुलीगत धोका'; बहिणीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 11:59 AM2024-08-06T11:59:49+5:302024-08-06T12:00:38+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. मात्र आता त्याच्या बहिणीनेदेखील आणखी काही खुलासे केले आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्यामुळे शोमध्ये थोडे नाविण्य पाहायला मिळत आहे. तसेच बिग बॉसच्या घरात कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सरला प्राधान्य देण्यात आले आहे. यात अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, इरिना रोडाकोवा या स्टारचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण (Suraj Chavan) सुरूवातीला थोडासा घाबरलेला दिसत होता. पण स्वतः बिग बॉसनेच त्याला सपोर्ट केल्याने त्याची गाडी पुन्हा रुळावर आलेली पाहायला मिळाली.
बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सूरजने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप पैसे मिळत असल्याचेही तो सांगताना दिसला. पण यामध्ये अनेकांनी त्यांची फसवणूक केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान आता एका युट्यूब चॅनेलला सूरजच्या बहिणीने आणि आत्याने आणखी काही खुलासे केलेले पाहायला मिळाले.
सूरज चव्हाण मुळचा बारामतीमधील असून मोरवे गावात स्थायिक आहे. आई वडील दोघेही हयात नसल्यामुळे तो लग्न झालेल्या बहिणींकडे तर कधी आत्याकडे राहून दिवस काढतो. टिकटॉकमधून मिळालेले पैसे त्याच्या मित्रांनी लुबाडले आणि त्यातून त्याला फक्त एक खोली बांधून दिली, असे त्याच्या बहिणीने या मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली की, सूरज खूप साधाभोळा आहे. वडिलांना कॅन्सर झाला होता. वर्षभर ते हॉस्पिटलमध्ये होते. पण तिथे त्यांना मुळीच करमत नव्हते. त्यामुळे ते हॉस्पिटलमधून ऑपरेशन झाल्यानंतर पळून आले. आम्ही सात बहिणी आमच्या नंतर सूरज झाला. मी सातवीत होते, तेव्हा सूरज पाचवीला होता. काही दिवसांनी वडिलांचं निधन झाले, तेव्हा सूरज मित्रांसोबत गोट्या खेळत होता. त्याला वडिलांचं निधन झालंय हे काहीच समजत नव्हते
सूरज बांधकाम करायला जायचा पण...
ती पुढे म्हणाली की, माझ्या बहिणींची लग्न झाली होती. याचदरम्यान माझी आई वेड्यासारखं वागू लागली. त्यामुळे मला शाळा सोडावी लागली. आईला रक्ताच्या उलट्या व्हायच्या तिला गाठ सांगितली होती. डॉक्टरांनी ऑपरेशनला ३५ हजार रुपये खर्च सांगितला पण कोणाकडेच एवढे पैसे नव्हते. त्यानंतर काही दिवसात आईचे निधन झाले. एक महिन्यानंतर माझेही लग्न झाले. सूरजला आत्या सांभाळू लागली. सूरज बांधकाम करायला जायचा पण त्याला त्यात इंटरेस्ट नव्हता. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलांनी सूरजला व्हिडीओ कसे बनवायचे ते शिकवले.
टिकटॉकवर तो फेमस झाला...
टिकटॉकवर तो फेमस झाला. यातून त्याला पैसे मिळायचे पण लोकांनी त्याला फसवले. त्या पैशातून एक साधी खोली त्याला बांधून दिली. बिग बॉसमध्ये त्याला बोलावले तेव्हा तो यायला तयार नव्हता. मला तिथे करमणार नाही असे तो म्हणत होता. पण साहेबांनी समजावलं तेव्हा तो तयार झाला. तो टीव्हीवर दिसतोय छान खेळतोय पाहून खूप भारी वाटत आहे. त्याला वाचता-लिहिता येत नाही. त्याला समजावून सांगावं लागतं. त्याला जरा सांभाळून घ्या, असे त्याची बहिण बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांना म्हणाली. तो बिग बॉसचा विजेता व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि तो नक्की जिंकेल, असा विश्वास सूरजच्या बहिणीला आहे.