"इडलीवाला, माकड म्हणून नावं ठेवली..." जान्हवीच्या पतीलादेखील करावा लागला ट्रोलिंगचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:54 PM2024-09-02T13:54:32+5:302024-09-02T13:58:02+5:30
नुकतीच किरण किल्लेकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना होणारा ट्रोलिंगचा त्रास यावर त्यांनी मौन सोडलं.
Janhavi Killkar Husband Reaction : 'बिग बॉस मराठी'चं यंदाच पर्व प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दिवसेंदिवस 'बिग बॉस'च्या घरामध्ये काहीतरी नवीन घडतंय. त्यात यंदाच्या पर्वात स्पर्धक जान्हवी किल्लेकरची सर्वत्र चर्चा होताना दिसते. जान्हवी तिच्या खेळीमुळे तसेच बेताल वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह पॅडी कांबळेसोबत तिचे वाद झाले. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने तिला चांगलंच सुनावलं. यावर जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी तिची बाजू सावरत तिचा स्वभाव तसेच ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
नुकतीच किरण किल्लेकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना होणाऱ्या ट्रोलिंगच्या त्रासावर मौन सोडलं. मुलाखती दरम्यान किरण यांनी सांगितलं, "पॅडी कांबळेंबद्दल जान्हवी जे काही बोलली ते खूप चुकीचं बोलली. त्यामुळे लोक आम्हाला लोक ट्रोल करत आहेत. माझ्या मुलालादेखील ट्रोल करतायत, वाट्टेल ते बोलत आहेत. शिव्या घालत आहेत पण शिव्या देण्याची एक पद्धत असते. ती उगाच सगळ्यांना हिरो बनवायला गेली आणि स्वत: व्हिलन बनली".
"ती जेव्हा बिग बॉस मराठी मधून बाहेर येईल तेव्हा ती बघेल आणि शॉक होईल की हे काय झालं.मला वाटतं माझी बायको चांगली आहे. पण तिने जे शब्द वापरलेत ते चुकीचे आहेत तसे तिने वापरायला नको हवे होते. आता ती जशी चांगली वागते तर लोकांना वाटतं की अॅक्टिंग करते. हिला शिक्षा मिळाली त्यामुळे बाहेर पडल्यानंतर आपल्याला कामं मिळणार नाहीत. यामुळे ती घाबरते आहे. शिवाय माझ्या भावाची बायको आहे त्या लोकांना पण ट्रोल केलं जातंय. जाऊबाई पण अशीच हिनेच तिला शिकवलं असणार असं म्हटलं जातं. तसेच या लोकांना खूप घमंड आहे, असं काहीजणांच म्हणण आहे .- कधी कधी माझा भाऊ इन्स्टाग्रामवर बघतो आणि दाखवतो, दादा हा बघ मला मेसेज आलाय. त्यावर माझ्या भावालादेखील घाण घाण बोललं जातं. त्याला तरी नाही बोललं पाहिजे". असं भाष्य किरण यांनी केलं.
या पुढे किरण म्हणाले, "शिवाय मला दिसण्यावरून देखील लोकांनी ट्रोल केलं. माकड, इडलीवाला, गव्हर्नमेंट जॉबवाला तसेच डुक्कर आहे. असं काही लोक बोलत आहेत".