"त्याने संधीचं सोनं केलं... " केदार शिंदेंनी केलं सूरजचं तोंडभरून कौतुक; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:30 PM2024-10-15T15:30:18+5:302024-10-15T15:38:07+5:30
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता.
Kedar Shinde : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सीझन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. या पर्वामध्ये बारामतीचा पठ्ठ्या गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणदेखील(Suraj Chavan) सहभागी झाला होता. आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने त्याने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. आपल्या दमदार खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरजच्या विजयानंतर त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. अशातच कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकमत फिल्मी'सोबत त्यांनी संवाद साधत अनेक गोष्टींचे खुलासे केले.
नुकतीच केदार शिंदे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "मला नाही वाटत त्याचं चुकलंय. तो त्याच्यामुळे मागे राहिला वगैरे असं काही नाही. लोकांची भावना सूरजबद्दल स्ट्रॉंग होती. घरातील लोकांचीही त्याच्याबद्दल तशीच प्रतिक्रिया होती. प्रत्येकजण बोलत होता तो सूरजबद्दल मनापासून बोलत होता. त्याला गेम कळत नसेल पण तो गेम चांगला खेळला. जेव्हा जेव्हा त्याला ती संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं".
पुढे ते म्हणाले, "काही लोकांना कोणतीही गोष्ट अगदी सहज, पटकन कळते,तर काही लोकांना गोष्टी कळण्यासाठी वेळ लागतो. तर कोणतीही गोष्ट समजण्यास वेळ लागतो या लोकांमध्ये सूरज मोडतो. शिवाय पटकन कळेल अशा लोकांमध्ये अभिजीत असेल. याचा अर्थ मला ते दोघेही समसमान वाटतात. पण, टास्क डोकं लावून खेळणं, स्ट्रॅटेजी वापरणं हे सगळं अभिजीतला जमत असतील. या उलट सूरज खूप निर्मळ, आपल्या चांगुलपणाला एक कुठलंही गोंदण न लावता आणि मी कसा आहे हे बघा असं त्याने कधीच केलं नाही. तो जेव्हा ते घर झाडायचा मी तेव्हा त्याला स्क्रिनवर पाहायचो तेव्हा वाटायचं, तो त्याचं काम करतोय".