Bigg Boss फेम सूरज चव्हाणला पाहताच शाळकरी मुलीला अश्रू अनावर; 'गुलिगत किंग'ला मिठी मारली अन् म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 02:02 PM2024-12-05T14:02:23+5:302024-12-05T14:18:31+5:30
गुलिगत किंग सूरज चव्हाणने शेअर केलेल्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांंचं लक्ष वेधलं आहे.
Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi)पाचव्या पर्वातील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला आहे. या शो मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये होती. हा शो संपला तरीही त्यांची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. अशातच बारामतीचा पठ्ठ्या सूरजने (Suraj Chavan) आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. लहानांपासून थोरामोठ्यांच्या मनात त्याने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर गुलिगत किंग सूरजच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्याला भेटण्यासाठी चाहते आतुर असतात. अनेकदा सूरज काही कार्यक्रमांमध्ये शाळांमध्ये भेटीगाठी देतो. तिथेही त्याच्या आजुबाजुला चाहते गराडा घालतानादिसतात. परंतु नुकताच सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर सूरज चव्हाणने त्याच्या एका चाहतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगी सूरज भेटण्यासाठी आलेली पाहायला मिळतेय. सूरजला फक्त भेटता यावं यासाठी ही मुलगी प्रचंड धडपड करत होती. त्यानंतर सूरजला भेटल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फूटला. गुलिगत किंग ची भेट झाल्यानंतर या शाळकरी मुलीला अश्रू अनावर झाले.
या व्हिडीओमध्ये सूरजची ही चाहती त्याला म्हणते- "मला तुला भेटायचं होतं. आज मी कुणाचं तरी स्टेटस पाहिलं आणि तू इथे आला आहेस हे मला कळलं. त्यामुळे मला तुला भेटावंसं वाटलं. तू इथे असतानाही मला कुणीही तुला भेटण्यासाठी येऊ दिलं नाही. मी इकडेच थांबले होते तर माझी एक मैत्रीण मला म्हणाली की, तू घरी जात आहेस आणि म्हणून मी इकडे तुला भेटण्यासाठी आले. या निरागस मुलीला रडताना पाहून सूरज चव्हाणने तिला शांत केलं आणि म्हणाला की, "तुला भेटायचं होतं, तर यायचं ना", असं बोलून त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
सूरजच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. शिवाय हा व्हिडीओ पाहून एका चाहत्याने कमेंट करत लिहलंय, "मोठ्या मनाचा माणूस सूरज भाऊ..." तर आणखी एका यूजरने लिहलंय, "जिंकलस रे भावा!" सूरजने शेअर केलेला व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.