Bigg Boss 16 : स्वप्न भंगलं...व्यसनाच्या आहारी गेले अन् सारं संपलेलं! 'बिग बॉस'च्या 'आवाजा'ची खडतर कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:06 PM2022-12-22T18:06:56+5:302022-12-22T18:07:17+5:30
Bigg Boss Narrator Vijay Vikram Singh : आज नेम, फेम, मनी सगळं काही असणारे विजय एकेकाळी दारूच्या नशेत तर्र असायचे...
Bigg Boss Narrator Vijay Vikram Singh : ‘बिग बॉस’चा एक आवाज तुमच्यापैकी सर्वांनी ऐकला असेल. या आवाजानं अख्ख्या देशाला वेड लावलं. आम्ही बोलतोय ते गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ला आवाज देणारे व्हॉईस आर्टिस्ट विजय विक्रम सिंह यांच्याबद्दल. याच विजय विक्रम सिंह यांची लाईफ स्टोरी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय, आज नेम, फेम, मनी सगळं काही असणारे विजय एकेकाळी दारूच्या नशेत लोळत पडले असायचे. यामुळे त्यांना गंभीर आजार झाला. अगदी या आजारपणात त्यांचा जीव देखील गेला असता... पण म्हणतात एक क्षण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. तसंच काही विजय यांच्याबाबत घडलं.
एक रिजेक्शन आणि सगळं बिघडलं...
कानपूरमध्ये राहणारे विजय एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्मले. पण लहानपणीच विजय यांनी एक स्वप्न बघितलं होतं. ते होतं, आर्मी ऑफिसर बनण्याचं. दिवस रात्र ते केवळ हे एकच स्वप्न जगायचे. पण पहिल्यांदा विजय यांनी परिक्षा दिली आणि ते रिजेक्ट झालेत. 17-18 व्या वर्षात हे रिजेक्शन विजय पचवू शकले नाही. त्यांचं स्वप्नं भंगलंच पण या काळात त्यांनी दारूला जवळ केलं. पुढच्या चार वर्षात ते आर्मीत 7 वेळा रिजेक्ट झालेत. एकूण 8 वेळा रिजेक्ट झाल्याचं दु:ख विजय पचवू शकले नाहीत आणि ते दारूच्या आहारी गेलेत. अगदी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना पाणी नाही तर दारू लागायची. या व्यसनाचा व्हायचा तो परिणाम झालाच. शरीर खंगले, आजार बळावले.
त्या एका क्षणाने आयुष्य बदललं...
7 वर्षात दारूच्या व्यसनाने त्यांना बर्बाद केलं. 2005 साली त्यांना पोटाचा गंभीर आजार झाला. फक्त 15 टक्के जगण्याचा चान्स आहे, असं डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं. याच काळात त्यांना न्युमोनिया झाला. यातून ते मरता मरता वाचले. लखनौच्या रूग्णालयात ते 30-35 दिवस भरती होते. याकाळात त्यांनी आपल्या कुटुंबाचे हाल बघितले. त्यांना झुरताना बघितलं. त्याक्षणीच त्यांनी निश्चय केला आणि त्या एका क्षणाने त्यांचं आयुष्य बदललं. कालांतराने विजय यांना सरकारी नोकरी लागली. नंतर मुंबईला आल्यावर ते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनले. 2009 मध्ये विजय यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 2018 साली त्यांनी अभिनय सुरू केला. आता त्यांचा आवाज नाही तर ते सुद्धा पडद्यावर दिसतात. अनेक रिअॅलिटी शोमध्ये ते नरेशन करतात. चित्रपटांना आवाज देतात....