Bigg Boss : 'बिग बॉस ७'च्या विजेत्याला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:38 AM2023-12-21T08:38:30+5:302023-12-21T08:42:56+5:30
रविवारी(१७ डिसेंबर) 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता घोषित करण्यात आला. पण, त्याच दिवशी रात्री बिग बॉस तेलुगु ७च्या विजेत्याला अटक करण्यात आली आहे.
टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच पाहिला जाणारा 'बिग बॉस' हा रिएलिट शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये हा शो सध्या सुरू आहे. 'बिग बॉस तेलुगुचं ७'वं पर्व नुकतंच पार पडलं. रविवारी(१७ डिसेंबर) 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता घोषित करण्यात आला. पण, त्याच दिवशी रात्री बिग बॉस तेलुगु ७च्या विजेत्याला अटक करण्यात आली आहे.
पल्लवी प्रशांत 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता ठरला. रविवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये पल्लवी प्रशांतला 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. पण, त्यानंतर लगेचच त्याला पोलिसांकडून अटकही करण्यात आली. अवैधरित्या गर्दी जमवून गाड्यांचे नुकसान केल्याप्रकरणी पल्लवी प्रशांतला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कलम १४७, १४८, २९०, ३५३, ४२७ R/W १४९ आयपीसी आणि धारा ३ पीडीपीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
१७ डिसेंबरला 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता घोषित करण्यात आला. पल्लवी प्रशांतने 'बिग बॉस तेलुगु ७'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अमरदीप चौधरी या सीजनचा रनर अप ठरला. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बिग बॉस तेलुगु ७'चा विजेता घोषित झाल्यानंतर हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओबाहेर पल्लवी प्रशांतच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अमरदीप त्याची आई आणि पत्नीबरोबर घरी जात असताना पल्लवी प्रशांतच्या चाहत्याकडून त्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यात त्याच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.