बिजल जोशीने सांगितले, मी ट्रेनमध्ये चढायला गेले आणि तिने माझे केस ओढले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:30 AM2018-11-12T06:30:00+5:302018-11-12T06:30:02+5:30
'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमात बिंदूची भूमिका साकारणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री बिजल जोशीने तिच्या पहिल्या ट्रेन प्रवासाचा एक भयानक अनुभव नुकताच सांगितला.
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर लवकरच प्रसारित होणाऱ्या 'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमाची वेगळी गोष्ट आणि त्यातील कलाकारांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. एका सामान्य मुंबईकरांचं आयुष्य ट्रेन आणि ट्रेनच्या प्रवासाशी जोडलं गेलेलं असतं आणि जेव्हा अशा ट्रेनमधून पहिल्यांदा प्रवास करण्याची वेळ असते, तेव्हा प्रत्येकाचाच काही ना काहीतरी रोमांचक अनुभव असतो. या कार्यक्रमात बिंदूची भूमिका साकारणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री बिजल जोशीनेही तिच्या पहिल्या ट्रेन प्रवासाची अशीच काहीशी गोष्ट सांगितली.
बिजल पहिल्यांदाच आणि तेही ऐन गर्दीच्या वेळात मुलूंड ते दादर असा प्रवास करत होती. गाडीत चढताना तिला अजिबात कल्पना नव्हती की, अशा वेळेचा प्रवास कसा असेल आणि किती गर्दी असेल. जशी ट्रेन आली तसं बिजलच्या बाजूला उभ्या असणाऱ्या बाईने ट्रेनमध्ये अगोदर शिरण्यासाठी तिचे केस ओढले. अशा वागण्याने बिजलला धक्काच बसला. पण पुढच्याच क्षणाला तिला कळून चुकलं की, मुंबईकरांचं आयुष्य असंच आहे. पण अशा भयानक अनुभवानंतर तिने शपथच घेतली की, इतक्या गर्दीच्या वेळेस यापुढे कधीही ट्रेनचा प्रवास करायचा नाही!
याविषयी बिजल जोशी सांगते, "हो, तो एक आयुष्यभराचा अनुभव होता. त्या बाईने माझे केस ओढले तेव्हा मी पूर्णपणे ब्लँक झाले होते. पण त्या गोष्टीनंतर मी शपथच घेतली की, गर्दीच्या वेळेतच काय पण मी कधीच ट्रेनचा प्रवास करणार नाही. हा एक अविस्मरणीय प्रवास होता पण चुकीच्या कारणांसाठी! आणि आता 'लेडीज स्पेशल' कार्यक्रमाने माझ्या आयुष्याने परत तेच वळण घेतलं आहे."
'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. या मालिकेची कथा खूप वेगळी असून ती प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
'लेडीज स्पेशल' ही मालिका लवकरच सोनी एंटरटेनमेन्ट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.