Chitra Wagh Vs Uorfi Javed : "ती नीट कपडे घालेल तेव्हाच...", उर्फीच्या बोल्ड कपड्यांवर चित्रा वाघ पुन्हा बोलल्या...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:49 PM2023-01-13T18:49:25+5:302023-01-13T18:51:25+5:30
Chitra Wagh Vs Uorfi Javed : सध्या उर्फी जावेदचीच चर्चा आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. आता हे प्रकरण आणखीच तापलं आहे.
Chitra Wagh Vs Uorfi Javed : सध्या उर्फी जावेदचीच चर्चा आहे. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. आता हे प्रकरण आणखीच तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता उर्फीनेही कठोर पाऊल उचलत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. नुकतीच उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत तक्रार दाखल केली. आपल्या जीवाला धोका असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. आता यावर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी नीट कपडे घालेल तेव्हाच हे प्रकरण मिटेल, असं चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
चार भिंतींच्या आत काहीही कर...
तिला कुठे जायचं तिथे जाऊदे. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. पण विषय समाजस्वास्थ्याचा आहे. माझी भूमिका मी मांडलेली आहे. माझी लढाई सुरुच राहणार आहे. आम्हाला जे करता येईल ते आम्ही करूच. हे प्रकरण आता तेव्हाच संपेल जेव्हा ती कपडे घालेल. तिने व्यवस्थित कपडे घालावेत. ती अशी फिरेल असेल तर हे प्रकरण चालूच राहील, असं त्या म्हणाल्या.
चार भिंतींच्या आत काहीही कर, पण बाहेर उघडं-नागडं फिरु देणार नाही. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार खपवून घेणार नाही. आज उर्फी जावेद मुंबईत नंगानाच घालतेय, उद्या बीडच्या चौकात उघडं-नागडं फिरलं तर चालेल का? असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
उर्फीचे वकील म्हणतात...
उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल करणारे तिचे वकील नितीन सातपुते यांनी उर्फीच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ उघडपणे धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. ते सातत्याने उर्फीला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्रास देत आहेत. तरीही वाघ यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. उर्फी जावेदच्या जीवाचं बरं वाईट होण्याची वाट पाहत आहेत का? आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे, असं ते म्हणाले.