आशिष रॉयच्या हाकेला धावून आले कलाकार, हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी देखील नव्हते पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:54 PM2020-05-22T12:54:01+5:302020-05-22T12:54:31+5:30
आशिष रॉयकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी 4 लाख रुपयांची होती गरज
लोकप्रिय अभिनेता आशिष रॉय मागील आठवड्यांपासून मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होते आणि उपचारानंतर त्यांना रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी 4 लाख रुपयांची गरज होती. मात्र आता सिनेइंडस्ट्रीतील कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत आणि आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता ते उपचार घेऊन घरी परतले आहेत.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, 54 वर्षीय आशिष रॉय यांच्या मदतसीठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार पुढे सरसावले आणि त्यांचे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी मदत केली आहे. इंडस्ट्रीतील सूत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार आशिष रॉय यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांमध्ये अनुराग कश्यप, दिग्दर्शक हंसल मेहता, दिग्दर्शक बिजॉय नंबियार, सीआयडीचे निर्माते बी.पी. सिंग, अभिनेत्री दिव्य ज्योती शर्मा, मॉडेल व अभिनेता सुशील पराशर यांसारख्या लोकांचा समावेश आहे.सामान्य लोकांनीही त्यांना जमेल तेवढी मदत केली आहे. तसेच कोलकातामध्ये राहणाऱ्या आशिष रॉय यांच्या बहिणीनेदेखील 2 लाख रुपयांची मदत केली आहे.
मुंबईत एकटे राहणारे आशिष रॉय काम व पैशांची तंगी असल्यामुळे अंधेरी येथील त्यांचा प्लॅट विकून कोलकाताला बहिणीकडे कायमचे जाणार होते. लॉकडाउनच्या आधी त्यांनी घराची डील देखील केली होती. अॅडव्हान्स 2 लाख रुपयेदेखील घेतले होते. मात्र लॉकडाउनमध्ये घर विकत घेणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली आणि ही डील रद्द झाली.
आशिष रॉय यांना या वर्षी जानेवारी महिन्यात माइल्ड स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यावेळी उपचारासाठी जवळपास 9 लाख रुपये खर्च झाले होते. अशात त्यांची सर्व जमापूंजी संपली होती. चार महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यावेळी त्यांच्याकडे पैशांचा अभाव असल्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमांतून लोकांकडे आर्थिक मदत मागितली होती.
आशिष रॉय यांनी ब्योमकेश बख्शीशिवाय काही सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच 'बनेगी अपनी बात', 'यस बॉस', 'बा बहू और बेबी', 'ससुराल सिमर का', 'एक रिश्ता साझेदारी का', 'कुछ रंग ऐसे भी', 'आरंभ' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुपरमैन रिटर्न्स', 'द डार्क नाइट', 'गार्जियन ऑफ द गैलेक्सी', 'द लेजेंड' ऑफ टार्जन', 'जोकर' या हॉलिवूडपटांच्या हिंदी व्हर्जनसाठी व्हॉइस ओव्हर दिला आहे.