रिएलिटी शोबाबत शानचा मोठा खुलासा, म्हणाला- "स्पर्धक लाइव्ह गाताना दिसतात, पण नंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:24 IST2025-04-10T11:23:43+5:302025-04-10T11:24:11+5:30
"स्पर्धकांचं गाणं नंतर डब करून...", रिएलिटी शोबाबत शानचा धक्कादायक खुलासा

रिएलिटी शोबाबत शानचा मोठा खुलासा, म्हणाला- "स्पर्धक लाइव्ह गाताना दिसतात, पण नंतर..."
शान हा बॉलिवूडचा लाडका सिंगर आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. द वॉइस ऑफ इंडिया आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स सारख्या रिएलिटी सिंगिग शोचं त्याने परिक्षणही केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शानने या रिएलिटी शोमागची दुसरी बाजू सांगितली आहे.
अनेकदा रिएलिटी शो हे स्क्रिप्टेड असल्याचं बोललं जातं. स्पर्धकांचे भावनात्मक अँगल दाखवल्याने रिएलिटी शोवर टीकाही झालेली आहे. आता सिंगर शानने रिएलिटी शोची पोलखोल केली आहे. शानने नुकतीच विकी लालवानी यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये शानने रिएलिटी शोमागची रिएलिटी सांगितली. शानने या मुलाखतीत रिएलिटी शोबाबत धक्कादायक खुलासा केला. २०१८ नंतर रिएलिटी शोमध्ये खूप बदल झाल्याचंही त्याने सांगितलं.
शानने समोर आणली रिएलिटी शोची खरी बाजू!
"मी सुरुवातीला काही शोचं परिक्षण केलं. तेव्हा स्पर्धकांच्या गाण्यांचं थोडं ट्युनिंग केलं जायचं. पण, आता तर पूर्णपणे ते डब केलेलं असतं. तुम्हाला ऐकताना ते छान वाटतं. पण, जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्यक्षात ऐकता तेव्हा तु्म्हाला कळतं की हा वेगळंच काहीतरी गातोय. स्पर्धक स्टेजवर फक्त एकदाच गातात. पण, नंतर ते रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये घेऊन जातात. आणि त्यांना पुन्हा गायला सांगतात. आणि बाकीच्या चुकलेल्या गोष्टींमध्ये बदल करतात. त्यामुळे जेव्हा प्रेक्षक ऐकतात तेव्हा त्यांना हे सुमधूर गातात असं वाटतं. त्यांचे सूर जराही हलत नाहीत, जे की शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून हे होत आहे. परीक्षकही असेच बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या कमेंटही तशाच बेसिक असतात", असं शान म्हणाला.