गोल्ड मेडलिस्ट आहे महाभारताची ‘गांधारी’; काळासोबत इतका बदलला लूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:32 AM2020-04-17T10:32:19+5:302020-04-17T10:35:36+5:30
‘हम लोग’मध्येही केले होते काम
‘रामायण’, ‘महाभारत’ या पौराणिक मालिकांसह अनेक लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्याने प्रेक्षकांसाठी लॉकडाऊनचा काळ सुकर झाला, असे म्हणायला हरकत नाही. सध्या या मालिकांमधील कलाकार चांगलेच चर्चेत आहेत. आज आम्ही महाभारतातील गांधारीचे पात्र साकारणा-या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. होय, अभिनेत्री रेणुका इसरानी यांनी गांधारीची व्यक्तिरेखा साकारली होती.
गांधारीची भूमिका साकारण्याआधी रेणुकांनी ‘हम लोग’ या मालिकेत काम केले होते. पण त्यांना खरी ओळख दिली ती गांधारी या भूमिकेने. खरे तर महाभारतात त्या पूर्णवेळ डोळ्यांवर पट्टी बांधून दिसल्या. पण तरीही या भूमिकेने त्यांना नवी ओळख दिली. महाभारत या मालिकेत काम करत असताना रेणुका केवळ 22 वर्षांच्या होत्या.
रेणुका राजस्थानच्या जयपूर येथील महाराणी कॉलेजात शिकल्या. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, त्या आॅल राऊंडर गोल्ड मेडलिस्ट आहेत. दिल्लीत रंगभूमीवर काम करतानाही त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले.
महाभारताआधी मणिपुरी स्टाईल ‘अंधाधुन’ नामक नाटक त्यांनी केले होते. या नाटकातही त्यांनी गांधारीची भूमिका साकारली होती. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असताना चेह-यावरचे हाव-भाव दर्शवणे तसे कठीण काम. मात्र रेणुका यांनी अगदी नैसर्गिक अभिनयाचे दर्शन घडवत, ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
ही भूमिका साकारणे अतिशय कठीण होते. पण वयाच्या 22 व्या वर्षी मला ही भूमिका करायला मिळाली, याचा मला आनंद होता, असे रेणुका एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
‘बडे अच्छे लगते है’ या शोमध्येही रेणुका यांनी काम केले. या शोच्या शूटींगदरम्यान साक्षी तंवरसोबत त्यांची खूप चांगली बॉन्डिंग झाली होती.