Breaking News: सरकार पडणार? हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणूक निकालादरम्यान 'ती' पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:18 PM2024-10-08T12:18:33+5:302024-10-08T12:19:32+5:30
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. "सरकार पडणार?" असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.
सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणूक निकालांकडे लागून राहिलं आहे. या दोन्ही राज्यात कोण सत्ता स्थापन करणार? सत्तापालट होणार का? याबाबत समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. "सरकार पडणार?" असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. "BreakingNews : आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज...सरकार पडणार?" असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. खरं तर कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते संभ्रमात आहेत. "प्रकरण नेमकं आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी ‘कलर्स मराठी’ ला सोशल मीडियावर फॉलो करा..." असं या पोस्टमध्ये पुढे म्हणण्यात आलं आहे. या पोस्टच्या खाली "याचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे वास्तवाशी संबंध जोडू नये" अशी टीप लिहिण्यात आली आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "आता फक्त आमचंच सरकार येणार", "बाईई...हा काय प्रकार घडला आता", "हो बिचुकले २०० मतांनी पुढे आहेत" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेचं हे प्रमोशन असल्याचं काहींचं म्हणणं आहे.