Bus Bai Bus : ‘या’ कारणानं चक्क अर्धा तास थांबलं विमान...; शुभांगी गोखलेंनी सांगितला लव्हस्टोरीचा ‘फिल्मी’ किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:00 PM2022-10-11T18:00:29+5:302022-10-11T18:02:03+5:30
Bus Bai Bus, Shubhangi Gokhale : ‘बस बाई बस’च्या मंचावर नुकतीच मराठीतील दिग्गज अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. यावेळी शुभांगी यांच्यासोबत धम्माल गप्पा रंगल्या. त्यांनी एक किस्साही यावेळी शेअर केला.
झी मराठीवरील अल्पावधतीच लोकप्रिय झालेला ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) हा कार्यक्रम खिळवून ठेवतो. नवनव्या दिग्गज महिला सेलिब्रिटी, त्यांच्या आयुष्यातील धम्माल किस्से, धम्माल आठवणी आणि गप्पा संपूच नये, असं हा कार्यक्रम पाहताना होतं. राजकारण ते मनोरंजन विश्वातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला याठिकाणी स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी होतात. आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ‘बस बाई बस’च्या मंचावर नुकतीच मराठीतील दिग्गज अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. यावेळी शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांच्यासोबत धम्माल गप्पा रंगल्या. त्यांनी एक किस्साही यावेळी शेअर केला.
शुभांगी गोखले यांचे पती व दिग्गज अभिनेते मोहन गोखले आज आपल्यात नाहीत. पती मोहन गोखले यांच्याबद्दल बोलताना शुभांगी नेहमीच भावुक होतात. मोहन गोखले यांनी फार कमी वयात जगाचा निरोप घेतला होता. शुभांगी गोखले वेळोवेळी त्यांची आठवण काढताना दिसून येतात. ‘ बस बाई बस’च्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या व मोहन गोखले यांच्या लव्हस्टोरीचा एक मजेदार किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, ‘मोहनने मला गिफ्ट देण्यासाठी अख्ख विमान थांबवून ठेवलं होतं. तब्बल पंचवीस मिनिटं ते विमान आमच्या दोघांसाठी थांबलं होतं. शुभांगी यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सुबोध भावे सुद्धा आश्चर्यचकित झाला.
नाटकात काम करत असताना शुभांगी यांची मोहन गोखले यांच्याशी ओळख झाली होती. यानंतर दोघांनी नाटक, मालिकेतून एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. ‘मिस्टर योगी’ ही दोघांची हिंदी मालिका खूप गाजली होती. एकत्र काम करता करता शुभांगी व मोहन प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं.
27 जुलै 1993 रोजी त्यांच्या एकुलत्याएक कन्येचा अर्थात सखीचा जन्म झाला. घरसंसार आणि सखीच्या पालन पोषणाची जबाबदारी सांभाळता यावी यामुळे शुभांगी अभिनयापासून त्यांनी दूर राहणं पसंत केले. याचदरम्यान मोहन गोखले यांनी हिंदी, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून आपला चांगलाच जम बसवला. मात्र 9 एप्रिल 1999 रोजी चेन्नई येथे ‘हे राम’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मोहन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या निधनानंतर स्वत:ला सावरत शुभांगी गोखले यांनी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, हम है ना, डॅडी समझा करो, लापतागंज, राजा राणीची गं जोडी, झेंडा, क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला.