"...पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालंय", कुशल बद्रिकेने सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:06 IST2024-05-07T14:59:51+5:302024-05-07T15:06:34+5:30
Kushal Bardike : अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयुष्यातील कटू सत्य सांगितले आहे.

"...पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालंय", कुशल बद्रिकेने सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
अभिनेता कुशल बद्रिके मराठी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तो चला हवा येऊ द्या शोमधून आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना खळखळून हसवत होता. या शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता तो सोनी टेलिव्हिजनवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कार्यक्रमात काम करतो आहे. मराठीप्रमाणेच हिंदी टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना यशस्वी झाला आहे. दरम्यान आता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयुष्यातील कटू सत्य सांगितले आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सुरूवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला, तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे दर्दी पाहिले, तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली.
पुढे त्याने पोस्टमध्ये लिहिले की, काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली. “बकासुरासारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन, कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला; ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत रहायचं. आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात, सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो !! - सुकून.
पोस्टला मिळतेय पसंती
कुशल बद्रिकेच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या पोस्टवर चाहते कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, वाह दादा काय लिहिलंय... माणसाच आयुष्य योग्य ट्रॅकवर आले की ट्रेनचा ट्रॅक सुटोतोच. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, कलाकार म्हणून मस्त आहातच. एक लेखक म्हणून पण मस्त आहात...खूप छान आणि व्यवस्थित लिखाण आहे.