आदित्य मीराला सांगू शकेल का त्याच्या मनातील भावना?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:06 PM2018-08-02T15:06:42+5:302018-08-02T15:09:08+5:30
सध्या 'आम्ही दोघी' मालिकेत आदित्य आणि मीरा यांची वाढती मैत्री पाहायला मिळते आहे.
झी युवा वाहिनीवरील 'आम्ही दोघी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगली दाद मिळते आहे. या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. या मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की अक्षयच्या ढोंगी स्वभाव सगळ्यांसमोर उघडकीस येतो आणि मीरा व अक्षयच लग्न तुटते. मीरा जरी उदास असली तरी आदित्य तिला पुरेपूर आधार देतो आणि प्रेक्षक सध्या मालिकेत आदित्य आणि मीरा यांची वाढती मैत्री पाहायला मिळत आहे.
मागील काही भागात प्रेक्षकांनी पाहिले की मीरा एका ऑडिटोरियममध्ये अडकते आणि तिचा फोन देखील लागत नसल्यामुळे घरातील सर्वजण चिंताग्रस्त होतात. मामांना तर मिराच्या काळजीने पॅनिक अॅटॅक देखील येतो. मधुरा आणि आदित्य मीराला शोधायला बाहेर पडतात. आदित्य कसाबसा मीरापर्यंत पोहोचतो. मीराला आदित्यला पाहून हायसे वाटते आणि जाऊन त्याला घट्ट मिठी मारते. आदित्य आणि मधुरा मीराला सुखरूप घरी घेऊन आल्यावर घरातील सर्व लोकांचा जीव भांड्यात पडतो. झालेल्या सर्व प्रकारचा विचार आदित्य करत असताना त्याला जाणवते की त्याच्या मनात मीराविषयी मैत्रीपेक्षा जास्त भावना निर्माण झाल्या आहेत. आदित्य मीरासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करायचा ठरवतो. आता आदित्य मीराला कसे सांगणार हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे.
आदित्य धीर एकवटून मीराला त्याच्या मनातील भावना सांगू शकेल का? त्यावर मीरा कशी रिअॅक्ट होईल? हे जाणून घेण्यासाठी 'आम्ही दोघी'चे आगामी भाग पाहावे लागतील.