'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम १० वर्षांनी घेतोय निरोप, 'या' दिवशी पाहा शेवटचा एपिसोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:09 PM2024-03-16T12:09:24+5:302024-03-16T12:10:36+5:30
हसताय ना? हसायलाच पाहिजे...असं म्हणत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सुरु व्हायचा. पण आता हा प्रश्न विचारणारा शो बंद होतोय.
गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आता निरोप घेत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, लेखक डॉ निलेश साबळे यांनी कार्यक्रमातून एक्झिट घेतली. तर सागर कारंडेने काही वर्षांपूर्वीच कार्यक्रम सोडला होता. टीआरपी रेटिंगमध्येही घसरण झाल्याने आता 'चला हवा येऊ द्या' शो बंद होत आहे. यामुळे या शोचे चाहते नाराज झालेत.
हसताय ना? हसायलाच पाहिजे...असं म्हणत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सुरु व्हायचा. पण आता हा प्रश्न विचारणारा शो बंद होतोय. उद्या म्हणजेच रविवारी या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. याच आठवड्यात शेवटच्या एपिसोडचं शूटिंग पार पडलं. नक्कीच हा एपिसोड धमाल असणार आहे. काही दिवसांपूर्वीच कलाकार श्रेया बुगडेने दशकपूर्तीनिमित्त फोटो पोस्ट केला होता. अनेक दिवसांपासून शो बंद होणार अशी चर्चाही होती. मात्र सर्वच कलाकारांनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र अधिकृतरित्या कार्यक्रम बंद होणार असल्याचं समजलं आणि चाहत्यांची निराशा झाली. 'चला हवा येऊ द्या' च्या प्रेक्षकांना उद्या शेवटचा एपिसोड पाहता येणार आहे. आता या शेवटच्या एपिसोडमध्ये निलेश साबळे आणि सागर कारंडे असणार हे उद्याच कळेल.
'चला हवा येऊ द्या' मध्ये मराठी सेलिब्रिटींपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार ते अनेक कलाकारांनी या मंचावर धमाल केली. निलेश साबळेंचं सूत्रसंचालन, त्यांची मिमिक्री सगळ्यांनाच आवडते. तर भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, स्नेहल छिदम हे कलाकार स्टार झाले. आता कुशल बद्रिके हिंदी कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला आहे.